ती.. मन व्याकूळ …

अगदी अनपेक्षित असा  एखाद सुखद धक्का बसावा ना,  तसा तो…नवा मोकळा श्वास घेऊन आला आज.  त्याचं हे  असं अचानक  येणं., माझ्यासाठी सर्वोच्च असा आनंदी क्षणच. 

वर्षोनुवर्षे  आपल्या प्रियकराची वाट पाहून  विरहात एकांडलेल्या मनाला  , नुसत्या त्याच्या चाहुलीने   जशी मनभर उभारी यावी नं , तसंच काहीसं झालंय..माझं आज ..!

प्रियकरचं ना तो ….

नुसत्या त्याच्या येण्याच्या  चाहूलीने ..अंग अंग मोहरून गेलंय. शहारलंय  ..उसळत्या अश्या धगधगीत श्वासानं…. ! 

काहीसा हलकेपणा ओघळू लागलाय  मनाशी..आता , 

पण ऐक ना  ?

आज तरी  नजर काळजातून  संवाद साधत,  तुझ्या ओसरत्या मनओघळ स्पर्शानं  …घट्ट मिठीत ओढून  घेशील ना मला ?  

मनाची हि  धगधगती, पेटती  मशाल आज शांत करायची आहे मला, बोल ना…?

तुझ्याविना  मला अस्तित्व नाही रे , माझं असणं हे केवळ तुझ्यासाठीच, माझी ओळख पाळख , माझं नाव गाव ,  सारं सारं  केवळ तुझ्यासाठीच, तुला वाहिलेलं. 

तूच माझी ओळख, तूच सर्वस्व…….

मन अधीर झालंय रे   …तुझ्यात सामावून जाण्यासाठी.  

अजून अधिक वेळ नको दवडुस…

माझ्या मनाचा हि विचार धर.  ?

तू आलास कि हा बंद श्वास (कित्येक दिवस तसाच खितपत पडलेला ) मोकळा होतो बघ…

तू आलास कि मनभर आनंद सरी बरसू लागतात….

मोगऱ्याच्या अस्तित्वानं दिशा दिशा गंधाळून जावी , तसं काहीसं होतं बघ, ह्या मनाचं , तुझ्या येण्यानं… 

तू आलास कि…लोकं मला स्वतःहून मोकळी करतात, तुझ्या स्वाधीन व्हायला….! 

हो.. हो …तुझ्या स्वाधीन  व्हायला. कारण त्यांना हि ठाऊक आहे. 

तुझं माझं नातं , तुझ्या माझ्या नात्यातला ओघळता हळुवार टपोर स्पर्श, तुझ्या  माझ्या नात्यातली   हसरी गंमत, मोहरते क्षण .. आणि …आणि अ..    

 बस्स , मला अजून अधीर करू नकोस.   सामावून घे तुझ्यात…

बघ , ऐकतेय मी .. जवळ आसपासच, उधाण आनंदाने तू मुक्त बरसतोयस. उधाणला आहेस. काळ्याभोर नभासह …

तो बघ ….त्या तिथे.!   

आणि मी …

मी ….

अजूनही ह्या बंद पाठपिशवीत , एकटक खिन्न पडून…………व्याकुळती.  

ऐकतोयस ना…

तुझीच  मन व्याकूळ …

‘छत्री’  

एका छत्रीचं  मनोगत …

– संकेत पाटेकर 

Leave a Reply

Your email address will not be published.