सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा -मुल्हेर – मोरा- भाग – २

संध्याकाळ ओसरली, सूर्य मावळतीला डुबून गेला आणि काळोख्याचे पडघम सुरु झालं.
तसा पोटा-पाण्यासाठी आम्हा चौघांच्या हालचालीला मंदसा वेग आला.
सरपणचा तसा इथे प्रश्न न्हवता . अवांतर पडलेल्या काट्या कुट्या लाकडं, दुपारच्याला मुल्हेर माची फिरतानाच..एक एक गोळा करत, सोमेश्वर मंदिरच्या अंगणात आणून ठेवल्या होत्या.
त्यामुळे सगळेच अगदीच निवांत होतो .

साल्हेरसारखी इथे परिस्थिती उद्भवली न्हवती. माथ्यावर इंधनासाठी म्हणाव तसं सरपण तिथे कुठे एक मिळालं न्हवतं आणि शोधून हि ते मिळणारं न्हवतं.
त्यामुळे नाईलाज म्हणून, इतरांनी आणलेल्या सरपणावर काय ते आम्ही पोटापाण्याचं निभावलं होतं, त्या क्षणी..
पण इथे, मुल्हेर किल्ल्याबाबतीत तसं न्हवतं.
झाडं- झुडपीच इतुकी एकेमेकांना खेटून उभी होती आणि आहेत कि सरपणासाठी कुठे दूर जाउन, ते आणण्याच्या खटपटीत आम्हाला पडावं लागलं नाही .

वेळ हि तसा मुबलक होता म्हणा .. .
पहाटे सहाच्या टोल्याला झालेल्या मोबाईलच्या घंटा नादामुळे आज जाग आली होती. (झोप तशी न्हवतीच रात्रभर ) पण जाग येताच, काही क्षणात, हात- पाय- तोंड न धुता तसाच अगदी, साल्हेरचा सर्वोच्च माथ्यावर सुसाट सुटलो होतो. सूर्य नारायणाचे तांबूस वर्णीय दर्शन घेण्यास..

तसं परशुराम मंदिर- साल्हेरच्या सर्वोच्च माथ्यावर वसलेलं, विराजमान झालेले एक छोटंसं मंदिर.

पण छोटंसं असूनही, चहूकडे पसरलेल्या उत्तुंग सह्यरांगामुळे आणि वाऱ्याशी झुंज देत अभिमानाने फडफड फडणाऱ्या त्या भगव्या मूळ, आपलं ऊर अभिमानानेच भरून येतं.

साधारण दीड ते दोन तास तरी ते नितांत सुंदर, लक्षवेधी , भव्य दिव्य, अलौकिक- अलंकारित अश्या स्वर्गीय अनुभवाचे गाठोडे, मनाशी बांधून, सूर्य नारायणाला वंदन करून साल्हेरच्या गुहेपाशी आम्ही येऊन पोचलो .

इथून पुढे मुल्हेर गाठायचं होतं. . त्यामुळे सॅक आवराआवर करत, काही वेळेतच गुहेतून निघालो. अन गंगासागर तळ्यापाशी येऊन..तोंडावर हलकासा पाण्याचा शिडकावा करून साल्हेरचा जड अंतःकरणानं निरोप घेतला.


साधारण ११ च्या आसपास.वळ्णा- वळणाच्या पायमोडी वाटेवरून, साल्हेरची भव्यता डोळ्यात वेचून अन कॅमेरात कैद करून, डोंगर कुशीत वसलेल्या साल्हेरवाडी जवळ येऊन पोहचलो.

दुरूनच तसं तीच नीटनेटकेपण आणि टुमदारपणा नजरेस खुणावत होतं.
पण मळलेल्या पायवाटेने, आम्हाला थेट गावापुढचा रस्ता दाखविला. त्यामुळे गावात न शिरता सरळ गावापासून काही अंतर पुढे ( वाघाम्बे दिशे कडे )येऊन पोहचलो.

रस्ता तसा निर्मनुष्य, मागेपुढे कुणी एक दिसेना, म्हणून साल्हेरवाडीच्या दिशेने माघारी फिरलो .
काही अंतर चाललो असेन तोच एक जिपडं, वेगानच आमच्यासमोरून चाल करून आलं.
आम्ही रस्त्या मधेच उभे असल्याने, हातवारे करत त्याला थांबवलं. अन नशिबाने म्हणा आम्हा तिघांना सामवून घेईल इतपत त्यात जागा मिळाली. त्यातच खुश झालो .
तसं आम्हास .. वेळेत मुल्हेर गाठायचं होतं. कारण मुल्हेरला एक मित्र आमच्या नावाने बोंब ठोकत थांबला होता. कधी येत आहेत रे तुम्ही ? असं म्हणत , शिव्या घालत बहुतेक..

त्याचं काय झालं..कि,
जानेवारीच्या २४ तारखेला, शनिवारी त्याला सुट्टी नसल्याने ..त्याला काही आमच्या सोबत येणं जमलं न्हवतं. अन म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवशी तो आम्हाला, थेट मुल्हेर गावीच भेटणार होता .
अन त्यानुसार तो तिथे हजर हि झाला होता. अगदी वेळेत..

पण इथे आमच्याने थोडा उशीरच झाला होता म्हणा, पण थोडाच काय तो,
म्हणून जिपडं जेंव्हा सामोरी आलं तेंव्हा मनाला थोड हायसं वाटलं.
गाडीसाठी वेळ वाया गेला नाही हे नशीब, असं म्हणत गाडीत बसलो अन गावरान संगीतातलं धडाकेबाज सूर वाऱ्यासंगे, पित, अगदी नाद लहरितच मुल्हेर गावी पोहचते झालो.

सकाळच्या साडे एकराचा टोला पडला होता.
उन्हं डोक्यावर कलली होती. पोटातील कावळे जरा कुरकरू लागले होते .
जिपडं जिथे थांबलं तिथेच बाजूला हापशी होती. तिथे पाण्याच्या काय त्या बॉटल्स भरून घेतल्या अन पेटपूजेसाठी म्हणून एक हॉटेल गाठलं. चौथा मित्र हि लगेचच भेटता झाला.

आणि चाविष्ट्य अश्या मिसळपाववर सर्वांनी एकदाच काय तो ताव मारत पोटाची खळगी थोडी बहोत काय होईना भरून काढली.

 

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा -मुल्हेर – मोरा- भाग – २

0 thoughts on “सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा -मुल्हेर – मोरा- भाग – २”

Leave a Reply

Your email address will not be published.