‘सह्याद्रीतली माणसं’

‘सह्याद्रीतली माणसं’


मनात खूप सारे विचार आहेत. जे शब्दबद्ध करायचे आहेत. कृतीत उरतवायचे आहेत.
त्यातलंच हे एक ..म्हणजे ‘सह्याद्री’तली माणसं ‘
हा एक स्वतंत्र लेख ..जो लवकरच घेऊन येतोय माझ्या ब्लॉग वर …

तसं आजवर सहयाद्रीच्या ..दऱ्या खोऱ्यानिशी वावरताना, आड अडगळ-ठिकाणी, कुठश्या वळणाशी , सह्यद्रीच्या माथ्याशी , पायथ्याशी , खूप माणसं भेटली. साधंसच जीवन जगणारी पण माणूसपण मनात ठासून धरलेली .
मायेचा पंख सदैव उघड ठेवणारी, कधी देवदूतासारखी धावून आलेली,
कधी अनोळखीपणाचं शाप मोडत आपलेपणचा बंध जुळवून,  मायेचा पांघरून धरणारी..
हि मनमिळावू माणसं.

मग त्यात देवगिरीच्या शोभा मावशी असो, जेवणासाठी आग्रह धरणारी,
स्वतःचा जेवणाचा डबा देऊ करणारी आणि निरोप घेता असता, आता येताना जोडप्यानीच या हं !
असं आपुलकीने म्हणणारी.
किंव्हा चकदेवच्या रानावनात राहणारे ते निर्मळ प्रेमळ आजी-आजोबा असोत , तहान भूक म्हणून गेलो असता , ताकाच पातेलंच समोर ठेवणारी,
शिंदे वाडीतल्या मोरे काकांसारखी नितळ स्वभावाची माणसं असो, वाट दावंनारी वा घरात आसरा देणारी किंव्हा
ऐन संध्याकाळी हडसर करून झाल्यावर,
जेवणासाठी खास आग्रह धरणारी आणि बोलता बोलता थेट रायगडापासून हडसर’ची रीतसर माहिती पुरवणारी, तिथलेच  काका काकी असो, वा मोटारसायकल बंद झाल्यावर दुकान बंद असूनही मदतीस धावून येणारी …अनोळखी पण आपलेपणानं धरलेली ती सारी माणसं ..
हि सारी सह्यद्रीची देणं… 

 

                                                                                   ‘‘सीताराम काका”

चहुबाजूनी किर्रर्र अश्या रानवाट्यांनी आणि बिबट्यासारख्या श्वापदांनी  वेढला गेलेला महिपतगड  आणि त्याच गडाच्या पायथ्याशी वसलेली टुमदार अशी बेलदारवाडी..
तिथले हे ‘सीताराम काका”
‘महिपतगड ( बेलदारवाडी ) सुमारगड ते रसाळगड’ ह्या आमुच्या त्रिकुट मोहिमेला ह्यांची साथ सोबत मिळाली. आणि म्ह्णूनच आमची हि मोहीम यादगार ठरली.
तिन्ही गड सर करता आले. अनुभवता आले.

महिपतगड सुमारगड ते रसाळगड हे अंतर पायी ..साधारण ८ ते नऊ तासाचं आहे .
(तुम्ही कोणत्या गतीनं वावरता  त्यावर ते अवलंबून आहे )
किर्रर्र जंगलातून ..माकड झेप घेत, वाटा धुंडाळत, तोल सांभाळत आणि पाण्याच्या साठा योग्य तितका वापर करत, इथून वावरावं लागतं.  ते हि सूर्य अस्ताला जाण्याअगदोर,

काका सोबत होते म्हणूनच आमची  हि मोहीम यशस्वी ठरली आणि आम्हाला रसाळगडच्या अभूतपूर्व  
सोहळा म्हणजेच जगबुडीच्या खोऱ्यातलं देखणं सूर्यास्त बघायला मिळालं.  
इथूनच आमच्या ट्रेकची सांगता झाली.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यवर बागडणारी  अशी माणसं सोबत असली म्हणजे ..
ट्रेक यादगार होणारच …

********************************************************************      

ज्याच्याकडे कॅमेरा , त्याच्या कडे हास्य आनंदाची कुपी …..
  ठाणाळे गाव _एक क्षण हास्याचा 🙂 _                                          
   निरोप देताना ..टिपलेला क्षण    
 
                                                                                                      
 
                                                                                    मल्हारगडचे  आजोबा …

सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातुनी मनमुराद वावरताना ..आपला विविध अंगी घटकांशी संबंध येतो. त्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तिथला ‘माणूस’ दळणवळणाच्या सुखसोयी अपुऱ्या असताही, तृप्त असणारा..

समाधानाची मिश्किल, हास्य रेषा चेहऱ्याशी झळकावत मुक्तः कंठे जीवन व्यतीत करणारा, हा साधा सरळ, मनमिळाऊ आणि कष्टाळू माणूस,
आपल्या खोपटी वजा घरात काही असो नसो, पण यथोच्छित आदरतिथ्य करणारा,
या बसा, चहा घ्या, जेवून जा, अस म्हणत सुवासिक गप्पा मारणारा, त्यात दंग होणारा हा माणूस..
पाऊस हाच त्याचा मायबाप ..

त्यावरचं त्याचं सारं गणित जुळलेलं. म्हणूनचं व्याकूळ आणि आशावाळ नजरेने..
आकाशी त्या मेघ राजाला तो खुणावत असतो.
बरस रे..बरस ..आता तरी…?
पण त्याची हृदयवेडी हाक त्यापर्यंत पोहचते का ?

हीच कळ ह्या आजोबांच्या हृदयातून हि पाझरली . बोलता बोलता,
यंदा पाऊस नाही…
मल्हारगड उतरतेवेळी, निवांत एका ठिकाणी, हे आजोबा विसावलेले दिसले .
नाव – श्रीकांत काळे – सोनोरी गाव.
तेंव्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधला तो क्षण.

सह्याद्रीत भटकताना हि माणसं नक्कीच भेटतात .
कधी स्वताहुन ती आपल्याशी संवाद साधत आपलंस करून जातात, तर कधी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं .
खूप काही मिळतं हो, प्रेम आणि आशीर्वादासहीत..

 
 
                                                                          गावाकडची माणसं ..
                                                         सांकशी (बळवली ) गावातील पाटील काका …
 
 
पनवेल नजीकचासांकशीच्या किल्ला अन निसर्गातील अद्भुत कलेचा तो कलात्मक नजराणा पाहून अंतर्मुख होवून आम्ही परतीच्या मार्ग , घनदाट वृक्षराजी, कधी मोकळं माळरानं, कधी पक्षी पाखरांची मंजुळ शिळ कानी गुळवत, फुलाफुलांचे रसपूर्ण ताटवे, रसिक मनाने न्हाहाळत. कधी डोईवरी आभाळातल्या पांढऱ्या पुंजक्याकडे कुतूहलाने एकाग्र होत, तांबड्या लाल मातीच्या मळवट पायवाटेने,  वळवळण घेत आम्ही बळवली गावा नजीक आलो .
तेंव्हा ह्या पाटील काकांची भेट झाली.
 

बळवली गावचेच हे पाटील काका ..

मनमिळावू मनाचे अगदी, गर्भ श्रीमंत माणूस..
चालताबोलता, केवळ ५-१० मिनिटांची क्षणभराची झालेली आमची काय ती ओळख..
त्यालात्यांनी आपलेपणाची जोड दिली.  अन निरोप घेत असता राहवलं नाही म्हणून
काहीतरी घेऊनच जा,  असा आग्रह करत हि झेंडूची फुले हाती दिली.

४० लिटर दुधाची रोजची विक्री, आंबे, चिकूची झाडे, वविध भाज्यांचे मळे, आपल्यात जमिनीची मशागत करत, वेगवेगळे त्यात प्रयोग करत …
‘बासमती तांदळाचं पिक घेऊन पारितोषिक मिळवणारे हे काका, आपल्या ह्या जमिनीवर
त्याचं फारच प्रेम.
त्याबद्दल पुढे काही गोष्टी हि सांगितल्या.

जमिनी विकून शहरात येणारे लोक, होणारी वृक्ष तोड, सरकारची वृक्ष लागवड
आणि फसगत, इत्यादी गोष्टींवर ते भर भरून बोलले.
अन जाता जाता…इतक सगळ आहे. अजून काय पाहिजे?
या पुन्हा, आलेत तर…अस हास्य मुद्रेने म्हणत ते त्यांच्या मार्गी अन आम्ही आमच्या मार्गीस्थ झालो.
गावाकडची अशी हि माणसं ..
साधी भोळी, उदार मनाची, हृदयात घर करून जातात कायमची …
ट्रेकला गेल्यावर वा आपल्या ह्या सह्यद्रीत उनाडताना अश्या लोकांचा क्षणभरासाठी का असेना सहवास हा लाभतो. 

पण तो उरतो..आयुष्यभरासाठी आठवणीत.
अश्याच आठवणीतल्या गाठोड्यातून …

********************************************************************

देवगिरीच्या ‘शोभा’ मावशी ..
 

आता पुन्हा याल ते एकत्रच जोडीने या, बरं का ? (म्हणजे लग्न वगैरे करून बायको सोबत )
देव तुम्हाला सदा हसत ठेवो.
निघता निघता मावशीचा आशीर्वाद आणि तिचे प्रेमळ शब्द मनाशी बिलगून आम्ही, आमच्या परतीच्या मार्गी लागलो.
देवगिरी किल्ल्याला निरोप देत, दोन दिवसाची आमची हि संभाजीनगर (औरंगाबाद) सफर, आता पूर्ण होणार होती. जवळ जवळ पाऊन ते एक तास, आम्ही देवगिरी किल्याच्या बालेकिल्ल्यावर स्थित,
‘ पेशवेकालीन गणेश मंदिराच्या ओट्यावर, ‘ त्या शांत वातावरणात,
स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या, शांत तितक्याच बोलक्या असणारया शोभा मावशीची बोलण्यात अगदी दंग झालो होतो .
त्याही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत होत्या. स्वतःबद्दल तसेच इथला इतिहासाबद्दल मुक्त कंठाने आम्हास सांगत होत्या.
त्यांची हि तिसरी पिढी.  नाव – शोभा खंडागळे .
सकाळी  सात वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ ते सव्वा  सहा वाजेपर्यंत ते बालेकिल्ल्यावर स्थित पेशवेकालीन ” गणेशाची” भक्ती भावाने पूजाअर्चा करतात .
येणाऱ्या भाविकास साखरेचा प्रसाद देऊन, दमलेल्या थकलेल्या मनास पाणी देऊन त्यांच मनशांत करतात .त्यांची विचारपूस करतात अगदी मनोभावे .
अगदी कधी कुणास स्वतःसाठी बनवून आणलेला जेवणाचा डबा देखील ते प्रेमाने देतात .
खाऊ घालतात .
त्यांची गणेशावर खूप श्रध्दा, जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने असे ते समजतात.
येणारे भाविक देवापाशी श्रद्धेने जो काही पैका ठेवतील तो त्यांचा पगार .
दौलताबाद गावातच त्याचं घर आहे.
त्यात त्यांची सासू, तीन मुले – त्यांची सून- नातवंड असे सारेजण एकत्रित राहतात.
साऱ्यांच नेहमीच चांगल चिंतणाऱ्या मावशी.. स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या आहेत.
आणि अशा मोकळ्या मनाच्या बोलक्या व्यक्ती क़्वचितच भेटतात आपल्या जीवन प्रवासात…

 
********************************************************************
                                                             वेरूळचा ‘ शाहरुख ‘ 
 
अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त ….
बघा तुमच्या गर्ल फ्रेंडला होईल.  गर्ल फ्रेंड साठी तरी घ्या हो..
नको नको म्हटले तरी तो माझा पिच्छा काही सोडत न्हवता.
नाव विचारले तर म्हणे ‘शाहरुख ‘
हेअर स्टाईल वरून तर तसा तो शाहरुखच वाटत होतां..
असो त्याच्या चेहऱ्यावरच हास्य मात्र अगदी निखळ होतं. त्यात स्वार्थभाव अजिबात नव्हता.
 
सांजवेळ होती. सहा वाजून काही एक मिनिटे झाली असतील, कैलाश लेणे पाहून नुकताच गेट बाहेर पडलो . आणि तिथल्या एका स्थायिक फेरीवाल्याने गाठलं.
हाती मार्बलची सुंदर पेटी आणि हत्तीचे कोरीव नक्ष काम केलेले ती सुबक मूर्ती .
त्याने दाखवायला सुरवात केली आणि मी सहज म्हणून ह्याचे किती असे प्रश्न करू लागलो.
त्याने त्यावर लगेचच उत्तर द्यायला सुरवात केली.
ह्या पेटीचे २५० रुपये,  ह्या हत्तीचे २०० रुपये..
ते ऐकून मी नकारार्थी मान फिरवली.
खरं तर ती नक्षीकाम केलेली सुंदर मार्बल पेटी घेऊसी वाटत होती.  पण २५० रुपये जरा जास्तच वाटत होते .कुठे हि बाहेर जाताना मग तो ट्रेक असो किंव्हा पिकनिक ठरवलेल्या पैशात सर्व भागवायच किंव्हा शक्यतो कमी खर्च करायचं .ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील असतो .
कुणास ठाऊक कुठे आणि कशी पैशाची गरज भासेल ? ते काही सांगता येत नाही ना ?
 तरी हि काही गोष्टी अशा असतात कि मनाचा मोह काही केल्या आवरत नाही .
नाही नाही म्हणता त्याची किंमत कमी करून, ती सुंदर नक्षीकाम केलेली मार्बल पेटी मी औरंगाबादची आठवण म्हणून विकत घेतली.
आणि पुढे चालू लागलो.
तोच पुन्हा एक इसम पुढे येत त्याजवळ असलेली अजिंठा वेरूळची पुस्तके आणि काही CD’s विकत घ्या असे विनवू लागला . त्याला नाही म्हटल.
आणि पुन्हा पुढे चालू लागलो.
आणि तोच समोर उभा राहिला तो शाहरुख. शाळेतल्या मुलांच्या वयाचा..
हेअर स्टाईल तर अगदी शाहरुख सारखीच. बोलणं मात्र अस्सल मराठी, तिथल्या स्थानिक भाषेतलं.
 चेहरा कसा तर हसरा..
त्याच्याकडची ती वस्तू मी नक्कीच विकत घेईन अशा पद्धीत्ने उमटलेले त्याच्या चेहऱ्यावरचे खात्रीशीर भाव.
हाती एक प्लास्टिक पिशवी, त्यात विक्रीसाठी ठेवलेलं सामान .
मला पाहून लागलीच त्याने बोलायला सुरवात केली.
हाती असलेल्या पिशवीतून एक वस्तू काढून मला त्याने दाखविली. ज्याचा मला काहीच उपयोग न्हवता. म्हणून मी सरळ नाही म्हटलं.
आणि ती वस्तू घेऊन तरी मी काय करणार होतो ?
मुलींच्या कानातल्या त्या कुड्या .
पण तरीही नाही म्हटल्या वर , अरे सर घ्याना घ्या ? तुमच्या गर्ल फ्रेंडला होईल.
अस कळकळीने तो म्हणू लागला.
माझी कुणी गर्ल फ्रेंड नाही रे ? अस मी तितक्याच स्पष्टपणे म्हणू लागलो .
अहो गर्ल फ्रेंड नाही तर बहिणी साठी घ्या ? बहिणीला होईल ?
ह्यवर मी काय बोलणार, अनुत्तर झालो . म्हटलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावू .
आवडल्या तर नक्कीच खुश होतील.
वढंच भावावरच प्रेम अधिक दृढ होईल .
आणि म्हणून मी त्या कानातल्या कुड्या  त्याच्याकडून विकत घेतल्या .
आणि तोच त्याच्या मनाची पुन्हा लगभग सुरु झाली .
माझ्या मित्रांना तो विनवू लागला .
तुम्ही सुद्धा घ्या ना एखादं ?
 
माझ्या मित्रांनी काही ते घेतलं  नाही. पण त्याची छबी मात्र त्यांनी कॅमेरात बंदिस्त केली  आम्ही .
आणि जाता जाता त्याला गमंत म्हणून विचारल , ‘ फेसबुक वर आहेस का रे, बाबा  ?
त्यातलं  त्याला काही एक कळल नाही. पण त्या बोलण्याने मात्र त्याच्या चेहरा निखळ हास्याने उमळला.  
असा हा वेरूळचा शाहरुख ..प्रवासात भेटलेला ..आणि मनावर स्वताचा छाप ठसवलेला .
प्रवास खरं तर अशा व्यक्ती रेखांनीच यादगार होतो,  नाही का ? त्यातूनच खरी संस्कृती समजते.
राहणीमान कळतं .  पोटासाठी सुरु असलेली जीवाची तगमग कळते.
 
********************************************************************

                                                         किल्ले कावनई – सुरकुत्यांचं हे देणे…

सुरकुत्यांचं हे देणे सांगे , 
जीवनाभुवनाचे कथा सार … भक्ती रस ….

त्यो महादेव हाय ना , त्याला हे बेल वाहा…लेकरांनो !!घोटी ला उतरलो , रिकाम्या पोटात ….मिसळ पाव आणि वडे ढकलत , 6-7 जणांना सहज सामावून घेईल अश्या रिक्षांतून 8 किमी रस्ता कापत ..कावनईशी आलो. . (कपिल धारा तीर्थ ) तिथून पुढे गड महालाकडे पायवाट पकडली. तेंव्हा वाटेत हे आजोबा दिसले.
काठी टेकत , हळूच आपल्या थरथरत्या अंगाने कुठेशी जात असावे. त्यांची आमची नजरा नजर झाली. गडाकडे चाललोय हे कळताच . त्यांनी किल्ल्यावर स्थित शंभू देवाकडे नजर फिरवली.
मोकळ्या निरभ्र आकाशाखाली, किल्ल्यावर वास्तव्य करून असलेल्या त्या शंभू देवाशी , वयोपरत्वे त्यांना आता जाणे शक्य होत नसावं. पण त्यांच्या नजरेतील ती भक्तिसाय आम्ही पाहिली , अनुभवली, तो एक क्षण …..

त्यांनी मग हळूच आपल्या गाठोड्यातून , बेलाची पाने काढली आणि ती देऊ केली.
त्या शंभो महादेवाशी वाहायला …

********************************************************************

                                                               इवलं गोंडस मन…

एवढ्याश्या वयात ..

शनिवार  रविवार ह्या सुट्टीच्या वेळेस ..बागडायचं खेळायचं सोडून …
सकाळचं खोपट्याबाहेर पडून , या गर्द रुणझुण झाडीत , इवलीशी जागा धरून , पावसाच्या टपोऱ्या सानिध्यात उभ्यानेच  , आपल्या माणसांसाठी आपल्या घरच्यांसाठी  दाणे शेंगा विकून हातभार लावणार हे इवलं गोंडस मन…
” निरागसता मनात भरली की देहमन हरपून जातं ”
ह्या लहानग्या पोरीला पाहताना तस्संच काहीसं झालं.
चेहऱ्याशी विलसत असलेलं हे आभाळ मोकळं स्मित… नजरेतनं झुळ झुळणारी ही निरागसता.. निथळणारं हे अजाण बोलकेपण…आणि ओठाशी हळूवार उमटणारं शब्दांचं मोहर..
पाहता…ऐकताच ,
हृदय जडलं अगदी..
कालच्या ट्रेक दरम्यान भेटलेली ही चिमुरडी..गोंडस अशी पोर,
सर शेंगा घ्या ना…?
असं येण्या- जाणाऱ्या कडे पाहून,हसऱ्या नि बोलक्या स्वरांनं आणि त्या अपेक्षित नजरेनं उभी असताना दिसली.
सकाळी , गड माथा गाठून, तो पुन्हा आम्ही उतरताना , ती त्याच जागेशी ठाम मांडून उभी होती.
रिमझिमणारा पाऊस..वृक्षराजींच्या दाटी वाटी,
दगड धोंड्याचे उंच सखल थर, भिजलेल्या निसरड्या पायवाटा, त्यात एका कोपरयात, जागा धरून,
उभ्यानेच, येणा जाणाऱ्याला न्याहाळणारं हे लहानगं मन..
दिसलं पाहिलं …आणि द्रवलो गेलो मनातून…
खिश्यात नेमकी एक दमडी शिल्लक न्हवती.
काही आणलं देखील न्हवतं.
तिच्या कडून शेंगा घ्यायला, तिला काही द्यायला.
ती सल मनात बोचून राहिली..,अजूनही सलते ह्या मनाला..
आपण काहीच करू शकलो नाही..

आनंद होऊ शकलो नाही..
आनंद देऊ शकलो नाही..
संवेदना जरी जाग्या माझ्यात
हृदय होऊ शकलो नाही ..
– संकेत पाटेकर

गर्द वनातील त्रिकुट : महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड

0 thoughts on “‘सह्याद्रीतली माणसं’

Leave a Reply

Your email address will not be published.