सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

साल्हेरं – नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई, तो झुंजार रणसंग्राम, मराठ्यांनी फोडलेला तो मुघली वेढा …
पेशवे मोरोपंत पिंगळे, सर सेनापती प्रतापराव गुजर ह्यांनी मिळून योजलेली हि एक नियोजनबद्ध अशी मैदानी लढत, मराठ्यांनी यशस्वी रित्या जिंकलेली अन इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली..
त्यासाठी हे मन खांस ओढवलं जातं. ते साल्हेर- मुल्हेरच्या दिशेने बागलाण प्रांतात…

बागलाण म्हणावं तर सधन-सुपीक प्रदेश. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरीला. हिरवेशार अगदी , झाडा झुडपांनी अन शेत बांधांनी सजलेला , नद्यां – तळ्यांनी परिपूर्ण, काळेकभिन्न कातळ कड्यांनी चहु बाजूंनी वेढलेला, मनाचा मोठेपणा सांगत सुटलेला, इतिहासाच्या पानात अजरामर झालेला, महाभारत काळापासून पावन झालेला, असा हा एक सुपीक संपन्न प्रदेश …

अश्या ह्या सुपीक संपन्न प्रदेशांत अन बलदंड किल्ल्यांच्या सहवासात, काही एक दिवस पहुडण्याचा नुकताच योग जुळून आला.
मनी खळखळत राहिलेलं सह्याद्रीतलं माझं एक स्वप्नं पूर्ण झालं.
सृष्टीच्या नयनरम्य देखावा , आपल्या गड-कोटांची ती कीर्तिवंत महती, ते अफाट शौर्य..
ह्याने तर चित्तच हरपले.

साल्हेरच्या परशुराम मंदिरा येथून.. चहु दिशेला डोंगर दऱ्यांचे, धुक्यात वेढावलेले ते विलोभनीय दृश्य पाहून असं वाटू लागलं, जणू स्वर्गीय भुतलाशीच आम्ही प्रवेश केला आहे .
स्वर्ग बघितलाय कुणी, कसा असतो ? कसा दिसतो ?काय माहित ? पण ह्या आपल्या पृथीवरील हे असे मनवेडे सृष्टी सौंदर्य पाहून नकळतच स्वर्गाची उपमा चाल धरून येते.
तेंव्हा वाटतं, एकाग्र दृष्टीने ह्या सृष्टी सौदंर्यकडे फक्त आपण पाहताच राहावं. अन इथेच ठाण मांडाव कायमच…

परशुराम मंदिर

धुक्यात वेढावलेले ते विलोभनीय क्षण..

कसे गेलो :-
नित्य नेहमीच्या त्या- त्या क्षणानुसार यंदा हि आमची सभासद आकडेमोड ७-८ वरून घसरून थेट ३ वर आली अन येताना पुन्हा ४ वर स्थिरावली.
सभासद आकडा किमान बारा हि न भरल्यानं, थेट खाजगी वाहन न करता एसटी महामंडळीचा लाल डब्यातून थेट जाण्याच, पर्यायच आमच्या समोर आ वासून उभा होता. त्यामुळे थेट काय तो विचार करून थेट आम्ही निघालो.
डोंबिवली वरून यतीन, घणसोली वरून अनुराग आणि ठाण्यावरून आम्ही म्हणजे मी असे एकूण तीन आकडी संख्या ने आमचा प्रवास सुरु झाला.

कल्याणहून रात्री १२.२१ च्या आसपास सुटणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसने कसेबसे नाशिक गाठले. (तिकीट साधारण डब्याचा असून देखील हि गर्दी म्हणून आरक्षण डब्यातून प्रवास केला, ह्यातच खूप मोठ सुख होतं . पुढे TC येउन देखील त्याने काही विचारलं नाही, हे त्यातल्या त्यात नवल म्हणायला हवं. रात्रीचा तो निरव शांततेत चाललेला तो गूढ प्रवास मात्र एकंदरीत सुखद असा होता.

पहाटे साडेतीनच्या आसपास नाशिकला उतरलो. तेंव्हा एके ठिकाणी मोठ्या आवाजात, लावलेली ती हिंदी सुरेल गाण्यांनी तर वातारवणाच संगीतमय करून टाकलं.
त्या लयातच स्टेशन मधून बाहेर पडलो आणि जुनं एसटी स्थानकात.. जाण्याकरिता रिक्षा गाठली.

नाशिक रेल्वेस्थानक ते जुनं एसटी डेपो, साधारण १० – ११ किलो मीटरच अंतर, ते गाठण्यासाठी साधारण पंधरा वीस मिनिट गेली .
डेपोत पोहोचलो. ताहाराबाद साठी एसटी ची चौकशी गेली. अन मग कडकडणाऱ्या, अंगअंग झोंब नाऱ्या.. त्या गारव्यात, वाफाळलेल्या चहाचा एक एक घोट घशात उतरवत गेलो. विशेष म्हणजे
अशा कडकडणाऱ्या थंडी मध्ये वाफाळलेली चहा प्यायला मिळणं म्हणजे …अह्हाहा !

तर असो..

साडे पाच दरम्यान ताहाराबाद साठी एसटी आली आणि प्रवासाची हि झुंबड उडाली.
जागा मिळविण्यासाठी जो तो जे सामान हाती मिळेल ते खिडकीतून सीट वर टाकू लागला.
त्यात कमाल म्हणजे एकाने तर आपला चक्क मोबाईल सीटवर टाकून दिला. मोबाईल पेक्षा सीट त्याला इतकी महत्वाची वाटावी ह्यांचच जरा नवल वाटलं. असो..

आम्ही पाठीवरल्या अवजड पाठपिशव्या घेऊन पुढे सरसावलो. दोघांना काय ती जागा मिळाली, ती ही मागच्या उधळणाऱ्या सीटवर. तिथेच बसकण मारली आणि निवांत झालो.

अडीस तासाच्या पहाटी प्रवासा नंतर आम्ही ताहाराबाद गाठले. अन पुन्हा चहाच घोट घेत ,वाघांबे साठी चौकशी केली. तेंव्हा कळलं कि आठची एसटी आहे. तसे आठ वाजण्यास अजून पाच एक मिनिटे शिल्लक होती. तोच नजर इकडे तिकडे फिरू लागली तेंव्हा एक ग्रुप तिथे नुकताच पधारलेला दिसला, तोही साल्हेरलाच ..प्रस्थान करण्यासाठी. त्यांच्याशी थोडी ओळख परेड झाली आणि वाघांबे
साठी दोन्ही जणांचा ग्रुप मिळून एक जिपडं ठरवून आम्ही साल्हेर वाटे निघालो.

तर अश्या लष्कारी दृष्ट्या महत्वाच्या अन पावन तपोभूमीत आमचा शिरकाव झाला.
आणिआठवणीत गर्क होवून गेलो. घोड्यांच्या टापांचा आवाज, मातीचा विजयी गंधयुक्त धुरळा डोळ्यासमोर पसरू लागला.
येथूनच कुठे ते दौडले असतील, इथेच उरल्या सुरल्या मुघलां नि मराठ्यांपुढे गुढघे टेकले असतील.
शरणागती पत्करली असेल .
इकडेच कुठे लढाई दरम्यान रणशिंग फुंकले गेले असतील, त्याचा आवाज अजूनही निनादतोय बघा..! हाच तो भूप्रदेश, हि ती माती..भाळी टीळावी अशी …

इतिहास, प्रेरणादायी इतिहास, भारावून टाकतो. असा शौर्यगीतांनी, त्या स्वरांनी..!

अर्धा-पाऊन एक तासानंतर आम्ही वाघांबे गाठले. गावात अजूनही कुड्यांची काही घर आपलं अस्तित्व दाखवून देत होती. त्याने माझ्या गावाच्या जुन्या घराची आठवण झाली. कालानुरुपे कुड्यांची घरांनी हळूहळू कात टाकली अन तिथे विटा सिमेंटच्या घरांनी जागा घेतली. गावाची शहरे झाली. अन गावचं गावपणच हरवून गेलं कुठेतरी. असं जाणवू लागलं. पण असो कालानुसार बदल हा येतोच अन तो असायलाच हवा.

वाघांबे गावात पोहोचलो आणि लोकांच्या नजरा आमच्या कडे वळल्या . नवीन कुणीतरी पाव्हणं दिसतंय म्हणून ..काही सुज्ञ मंडळी आमच्या भोवती गोळा झाली. अन आमच्यातल्या देवान घेवानाला, म्हणजेच संवादाला सुरवात झाली.

साल्हेर किल्ल्याकडे जाणारा रस्ता , गावाकडे ये-जा करणारी एसटी , तिचं वेळापत्रक, एखाद कुठलं हॉटेल, राहण्याची सोय , आदी काही विषयांची विचारपूस झाली . .
आणि त्यांनतर आम्ही साल्हेरकडे प्रस्थान केलं.

ताहाराबाद वरून येणारा रस्ता वाघांबे करत – साल्हेर वाडीकडे वळसा घेत जातो .
वाघांबे गावातून, त्याच सरळ रस्त्यामार्गे पुढे गेल्यास, पंधरा एक मिनिटावर नदीचा पूल लागतो .
तो ओलांडला कि डावीकडे एक वाट वळते. दगड धोंड्याची, खाच खळग्याची, प्रेरीत मातीची..वेडी वाकडी अशी ती वाट, आपल्याला साल्हेर – सलोटा खिंडीकडे घेऊन जाते.

उभ्या चढणीची, छातीचा भाता वर- खाली करणारी हि वाट पुरती दमछाक करणारी आहे. ह्याचा अनुभव त्या वाटेवरून गेल्यास नक्कीच मिळतो.

साल्हेर-सालोटा खिंडीकडे जाताना.. समोर दिसतेय ती साल्हेर खिंड..


सोंडीवाटे हि वाट आपल्याला साल्हेर-सालोटा खिंडी कडे घेऊन जाते. अन तिथून दोन पायवाटा फुटतात, एक साल्हेर दिशेने तर दुसरी पुढे सालोट्या कडे..

साडे नऊच्या आसपास आम्ही वाघाम्बे गावातून आगेकूच केली. अन दुपारच्या तळपत्या सूर्य किरणांसोबत साल्हेर -सालोटा खिंडीत पोहोचलो.
थोडा उशीरच झाला होता म्हणा,
वेळेच नियोजित, आखलेलं गणित चुकलं होतं. एक तास असाच वाया गेला होता . चुकणाऱ्या वाटेकडे नकळत पाउल वळल्यामुळे..

पण असो, खिंडीत पोहचलो आणि एक दीर्घ श्वास घेतला. एकदाची खिंड गाठली, ह्यांचा आनंद चेहऱ्यवरून आमच्या ओसंडून वाहू लागला होता. स्फुरण चढत होतं.. पुढच्या पाउल वाटेसाठी..
त्या जोशातच सालोट्याकडे वळलो.

खिंडीतून होणारं साल्हेरचं दर्शन..

सालोट्या कडे पाय वळले. काही अंतर पार केलं आणि तोच साल्हेरचं हे रांगड चौफेर रूप नजरेत भरलं. पहातच राहावं असं..

पुढे निमुळत्या अन घसाऱ्या युक्त वाटेतून पुढे जात राहिलो.
एकीकडे सरळसोट दरी, ‘ पाउलं हळूच टाका हो, ‘असं म्हणत आम्हास जणू सावध करत होती.
त्यामुळे नजर अगदीच स्थिर होती. पाऊला पाऊलावर..

साल्हेरपेक्षा सालोट्याची वाट थोडी खडतर आहे. हे पुस्तकात वाचलं होत अन ते आता प्रत्यक्ष अनुभवत होतो .
अश्यातच अचानक पक्षांचा एक थवा आकाशी डोक्यावरून पुढे झेपावला. तेंव्हा पाउलं जागच्या जागीच स्थिरावली. इतकं सुंदर दृश्य मला वाटतं मी पहिल्यांदाच पाहत असेन.
ते सारे क्षण नजरेत टिपून घेतले.
काही क्षण असाच स्तब्ध उभा राहिलो अन नजर सालोट्या कडे वळविली.

त्याच्या त्या दिव्यं आणि अफाट रुपानं मात्र धडकीच भरली. पुढची वाट त्या खाचेतून जाणार होती. नराचा वानर करून…

पण वेळ आम्हास जणू चेतावणी देत..सावध करत होती. वर-वर आमच्या दशाअवतारला पाहून खट्याळपणे हसत हि होती.
बघा काय तो नीट विचार करा ? तुम्हाला पुन्हा ह्याचं वाटेनिशी परतायचं आहे.
सालोटाचा तो उभा चढ चढून-उतरून, पुन्हा साल्हेर कडे मुक्कामी. ते हि अंधारायच्या आत..
आणि तुम्हाला तर अजून वाट हि गवसली नाही. ? विचार करा?
वेळेच गणित तसं विस्कटलचं होत म्हणा…

दुपारचा एक वाजत आला होता. अजून वाट ती मिळत न्हवती .
त्यात सालोटा चढून उतरून साधारण चार ते पाच नक्कीच झाले असते . त्यात पुन्हा साल्हेर सर करायचंम्हणजे रात्र हि ठरलेलीच…
त्यातल्या त्यात पोटातले कावळे हि भुकेने वेडावू लागले होते .
सोबत पिण्याचा पाण्यचा प्रश्न हि होताच. ते हि जवळ जवळ आता संपत आलं होतं.
अन महत्वाचं म्हणजे उभ्या चढणीनं , शरीर हि खूप थकलं होतं.
अशा स्थितीत, सालोटा अर्धवट सोडून.. पुन्हा साल्हेरकडे जाण्याचा मनसुबा आम्ही एकमताने पास केला. आणि साल्हेर दिशेने आम्ही पुढे होऊ लागलो.
पुढच्या वेळेस नक्की येऊ रे , पुन्हा तुझ्या अंगा-खांद्यावर लोळण घ्यायला, असं मनोमन म्हणत..

पुढे धीम्या गतीनं साल्हेरकडे कूच केलं. अन सालोट्य़ाच्या ह्या रुपानं.. अगदी मोहित झालो.

साल्हेरचा पहिला दरवाजा लागला. त्याकडे पाहत , त्याची छबी घेत पुढे निघालो.

अन भव्य- दिव्यं -अफाट सालोट्याचं पुन्हा मनोवेधक दर्शन झालं.


पुढे दगडात कोरलेल्या पायऱ्या लागल्या…

अन साल्हेरचा दुसरा भक्कम दरवाजा नजरे समोर उभा ठाकला.

 
दुसऱ्या दरवाज्या पाठोपाठ तिसरा कमानयुक्त दरवाजा हि लगेच नजरेस आला.
 
त्या दरवाज्यातून, सालोट्या हे राकट रूप कॅमेरात टिपून घेतलं. अन पुढे सरसावलो.

पाच दहा मिनिटे पुढे चालत राहिलो. अनेक गुहा आणि कोरड्या टाकी दृष्टीक्षेपात येत होत्या.
पण त्या गुहा राहण्याजोग नाही. हे त्याकडे पाहून कळत होतं. त्यातच चौथा दरवाज्याजवळ येउन ठेपलो.

चौथा दरवाजा…

येथून पुढे आम्ही मोकळ्या पठारावर पोहोचणार होतो. साल्हेर च्या भव्य परिसरात आमचा प्रवेश झाला होता. आनंद दुनानत होता. चेहऱ्यावरून विजयी मुद्रा झळाळत होती.
ती विजयी मुद्रा घेऊनच आम्ही नव्या जोश्याने , रेणुका मंदिराचा शोध घेऊ लागलो .
त्याच्याच पुढे आसपास कुठे त्या गुहा होत्या . जिथे आजचा आमचा मुक्काम होणार होता .
त्यासाठी पाउलं झप-झप पुढे पडू लागली.

पुढे गेलो अन काही अवशेष आणि ह्या दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या .पाणी अर्थात पिण्याजोग असं न्हवतं. . ते वर वर दिसतंच होतं. 

टाक्याच्या पुढेच, गंगासागर तलाव अन रेणुका मंदिर दिसलं.

‘रेणुका देवी आणि श्री गणेश ‘ डोळ्यातले भाव निरखून पहा.. काय वाटतं ?

गंगासागर तलाव..
मंदिराच्या चौकटी मधून तळ्याचं हे शांत रूप.. कॅमेरात कैद केलं.

दिवसभराचा, छाती एवढा चढ, ह्याने फारच थकवा आला होता. अंगात तशी ताकदच उरली न्हवती.
मुक्कामी जेंव्हा ती गुहा नजरेस आली तेंव्हा तिथल्या तिथे अंग झोकून दिले .
आडवा झालो .पंधरा एक मिनिटे तरी तसाच शांत पडून राहिलो .
तना- मनाला आलेला शीण दूर करायला असे क्षण हवेच असतात. आपल्या रोजच्या धावत्या जीवनात हि
प्रसन्नतेचा, नव चैतन्याचा लेप मनभर पसरवत, पुन्हा त्याच जोमानं पुढे होण्यासाठी..

राहण्यसाठी उत्तम जागा ..हीच ती गुहा ..
एका वेळेस साधरण ३४ एक जन आरामशीर राहू शकतात.

दुपारचे साडे तीन झाले होते. शरीर मनाला आराम देऊन, आता पोट पूजेच्या मागे लागायला हवं होत. त्यासाठी लगभग सुरु झाली.
तसे गडावर आम्ही तिघे सोडून इतर अजून पाच ‘च मंडळी हजर होती. त्यामुळे सगळं निवांत होतं. आवाज गोंगाट अगदी शून्यात होते.
गुहेचा एक कोपरा आम्ही झाडून पुसून आमुयांच्यापुरतं लक्ख करून ठेवला आणि खादीसाठी (अन्नग्रहण) पुढे बसलो.

नित्य नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे आणि टिकावू म्हणून (ते असणे क्रमच म्हणा) तिघांकडे अन्नाचा एकच प्रकार होता. ते म्हणजे ‘थेपले’ तेही मेथिचेच. त्यासोबत कुणी चटणी आणली होती. तर कुणी पिचकु…

ते खाऊन पाच एक मिनिटाने सरपणासाठी बाहेर पडलो. साल्हेरचा गाद माथा गाठता गाठता हालत इतकी खराब झाली होती कि सोबत सरपण घेणं शक्य झालंच नाही. त्यामुळे कुठे काही मिळतंय का ? ह्यासाठी आता बाहेर पडलो .
अन नारळाच्या शेंड्या सोडून इतर काहीच हाती न मिळविता तसंच गुहेत परतलो.
साल्हेरच्या माथ्यावर सरपण कुठेच मिळणार नाही. हे माहित होतं अस नाही . पण त्या उभ्या चढणीने अंगातली शक्तीच पार नाहीशी झाली होती. त्यामुळे ते राहून गेलं.

त्यामुळे आता पुढचा प्रश्न निर्माण झाला होता.
आता काय ? कसं करायचं ? जेवणा खावानाच काय ?
पण तो हि प्रश्न सुटला. इतर ग्रुपच्या ट्रेक बंधूनी आणलेल्या सरपणावर आमचं काहीसं भागणारं होतं.
शेवटी ज्याला त्याला जो तो उपयोगी पडतोच. पण तरीही आमच्यावतीने जे काही मिळेल ते आणून
आम्ही त्यात थोडी अधिक भर घातली अन निवांत झालो.

संध्याकाळच्या धो-धो पावसाने अवेळी हजेरी लावून धिंगाणा घातला होता. त्यामुळे सगळेच त्या गुहेत एकजूट झाले होते.
गोंधळ, बडबड वाढली होती.
जवळ-जवळ चार एक जणांचा ग्रुप आणि त्यात किमान चौतीस जणं तरी गुहेत उपस्थित होती.
रात्र त्यातच सरली.
आणि पहाटेपरी जाग आली. झोप तशी न्हवतीच मुळी.
पण उगवत्या सूर्य नारायणाचे दर्शन घ्यावे म्हणून साडे सहाच्या टोल्याला, कॅमेरा हाती घेऊन गुहेच्या वरच्या बाजूने ,आम्ही परशुराम मंदिर गाठले.

परशुरामांची म्हणावी तर हि तपोभूमी. थेट आपल्याला पुराणकाळात घेऊन जाते
येथूनच त्यांनी बाण सोडून , समुद्र मागे हटवला होता. असं म्हटलं जातं . तिथे आमचे मस्तक नकळत टेकले गेले.

परशुराम मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतलं. आणि चहूबाजूच्या सृष्टी सौंदर्याने फार सुखावून गेलो .
हि अमाप माया देणारी सृष्टी,
तिच्या सहवासात एकदा आलं कि ती लगेच आपलसं करून टाकते. कोण, कुठला?
हे ती जाणत नाही. जाणून घेत नाही. बस्स..प्रेमाच्या वर्षावात ती न्हाऊन टाकते. अमाप सुख देऊन..
मायेचा प्रेम भरला हसरा हळुवार स्पर्श करून..

वाटतं असंच पाहतच राहावं, ह्या सृष्टी सौंदर्याकडे, त्याच्या गोजिऱ्या साजिऱ्या रुपाकडे टकमकतेने, एकाग्रतेने ,
धुक्याची हि दुलई आणि त्यात निवांत विसावलेली हि सह्यवेडी रांग पाहत..

खरंच..!  हा निसर्ग अद्भुत आहे. अलंकारित आहे. वेडावणारा, वेड लावणारा आहे. सुर्यास्ताच्या अन सुर्योदयाच्या तांबड्या सौम्य क्षितीज छटा, सह्याद्रीच्या कड्यावरून गड-किल्ल्यावरून पाहणं, अनुभवनं म्हणजे एक दिव्य सोहळाच…मनाला भुलविणारा..
अंधाराकडून प्रकाशकडे नेणारा..

कधी कधी वाटतं..विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती जपण्यापेक्षा, निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत.. शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा. तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. अन त्यातूनच उतू जाणारा आनंद,  घटका घटकाने गिळंकृत करावा. बस्स..

किती वेळ तरी आम्ही त्या टेकडावर, ते सृष्टी सौंदर्य न्हाहाळत होतो. घटका घटकाने प्राशन करत होतो .
ह्या क्षितीज रेषेनं असेच ह्या हृदयी मनावर आपली छाप उमटवली..

पण वेळेचं मर्यादि भान हे प्रत्येकाला ठेवावाच लागतं. नाहीतर पुढंच गणित कोलमडतं .त्यासाठी आवरावर करावीच लागते.
आम्हाला हि पुढे मुल्हेर गाठायचं असल्याने धाव घ्यावी लागली. साल्हेर ला निरोप देऊन..

साधारण नऊ- सव्वा नऊच्या आसपास, तळ्याकाठी.. मस्त ताजे-तवाने होवून आम्ही साल्हेर वाडीकडे कूच केले .किल्ल्याच्या दोन्ही वाटेने ये जा करणं हे आलंच..
किल्ला तसा चहू बाजूने पहावा. येताना वाघाम्बे वरून आम्ही खिंड गाठली अन साल्हेर सर केला आणि आता साल्हेर वाडीकडून मुल्हेरच्या दिशेने आमचा मोर्चा वळविला.

गंगासागर तलाव..

 
एक एक छबी कॅमेरात बंदिस्त करत ..

 
 
साल्हेरवाडी कडे जाताना लागणारा दरवाजा ..

एका वेगळ्या अंगाने टिपलेला फोटो..

साल्हेर कडा अन दरवाजा ..

 

कमळ पुष्प ..

पायथ्यापासून साल्हेर …

डोंगर कुशीत वसलेली साल्हेर वाडी ..

साधारण एकराच्या आसपास, वळणावळणाच्या पायमोडी वाटेवरून, साल्हेरची भव्यता डोळ्यात वेचून आणि कॅमेरात कैद करून , डोंगर कुशीत वसलेल्या साल्हेरवाडी जवळ येऊन पोहचलो.
दुरूनच त्या वाडीचा नीटनेटकेपण अन टुमदारपणा नजरेस खुणावत होता.
पण मळलेल्या पायवाटेने आम्हाला थेट गावा पुढचा रस्ता दाखविला. त्यामुळे गावात न शिरता सरळ गावापासून काही अंतर पुढे ( वाघाम्बे दिशेकडे )येऊन पोहोचलो.
रस्ता तसा निर्मनुष्य. मागेपुढे कुणी एक दिसेना, म्हणून साल्हेरवाडीच्या दिशेने माघारी फिरलो.

काही अंतर चाललो असेन तोच एक जिपडं, वेगानच आमच्यासमोरून चाल करून आलं.
आम्ही रस्त्या मधेच उभे असल्याने, हातवारे करत त्याला थांबवलं. अन नशिबाने म्हणा, आम्हा तिघांना सामवून घेईल इतपत त्यात जागा मिळाली. त्यातच खुश झालो .

तसं आम्हास, वेळेत मुल्हेर गाठायचं होतं. कारण मुल्हेरला एक मित्र आमच्या नावाने बोंब ठोकत उभा होता. कधी येत आहेत रे तुम्ही ? असं म्हणत आणि शिव्या घालत बहुतेक …
त्याचं काय झालं..कि,
जानेवारीच्या २४ तारखेला, शनिवारी त्याला सुट्टीनसल्याने ..त्याला काही आमच्या सोबत येणं जमलं न्हवतं. अन म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवशी तो आम्हला थेट मुल्हेर गावीच भेटणार होता.
आणि त्यानुसार तो तिथे हजर हि झाला होता. अगदी वेळेत ..
पण इथे आमच्याने थोडा उशीरच झाला होता म्हणा, पण थोडाच काय तो,
म्हणून जिपडं जेंव्हा सामोरी आलं , तेंव्हा मनाला थोड हायसं वाटलं.
गाडीसाठी वेळ वाया गेला नाही हे नशीब, असं म्हणत गाडीत बसलो अन गावरान संगीतातलं धडाकेबाज सूर वाऱ्या संगे, पीत अगदी नाद लहरितच मुल्हेर गावी पोहचते झालो .
सकाळच्या साडे एकराचा टोला पडला होता .
उन्हं डोक्यावर कलली होती. पोटातील कावळे जरा कुरकरू लागले होते .
जिपडं जिथे थांबलं तिथेच बाजूला हापशी होती. तिथे पाण्याच्या काय त्या बॉटल्स भरून घेतल्या अन पेटपूजेसाठी म्हणून एक हॉटेल गाठलं. चौथा मित्र हि लगेचच भेटता झाला.
अन चविष्ट्य अश्या मिसळपाव वर सर्वांनी एकदाच काय तो ताव मारत, पोटाची खळगी थोडी बहोत काय होईना भरून काढली.

– संकेत पाटेकर

 

 

 

0 thoughts on “सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

  1. Tuje ase Tracking che post read karat asstana … tuja sobat amhi sudha tracking la aalo aahe ase feel hote……….

  2. माझ्या ब्लॉग ला वेळ काढून भेट दिल्याबद्दल अन हे सगळ वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल
    आपले मनापासून धन्यवाद ..
    आपल नाव कळल असत तर अधिक आनंद झाला असता. 🙂

Leave a Reply

Your email address will not be published.