सह्याद्रीतलं सोनं..

कुणी मला विचारलं ना ? कि तू एवढं गड किल्ले फिरतोस, कड्या कपाऱ्यातून भटकतोस, एकांतात वसलेल्या गड मंदिरात..मोकळ्या पठाराशी रात्री हि वास्तव्य करतोस. मग त्यातील एखाद अविस्मणीय रात्र कुठली ? मनाला मोहिवणारे, वेडावून देणारे हृदयव्यापि क्षण कोणते ? मनाला छेदून देणारी एखाद आठवणीतली घटना कोणती . ?
त्याचं उत्तर मी असं देईन.

अविस्मणीय रात्र म्हणाल तर ….

१. चहू दिशा घनदाट अश्या रान झुडपाने व्यापलेल्या, बिबट्याच्या सावटाखाली आणि अवघ्या चार जणांच्या सहवासात, जागून पिंजून काढलेली महिपतगडावरील ती मंत्ररलेली रात्र..  (दुसऱ्या दिवशी बिबट्याचा पराक्रम कानी ऐकू आलेला, त्याने सर्वत्र शुकशुकाट पसरलेला. )

सह्याद्रीतलं सोनं …

२.  नाशिक मधील सप्तशृंगी देवीच्या सहवासातील , रवळ्या जवळ्या किल्ल्यावरील, त्या मधल्या विस्तीर्ण पोकळीत गच्च हिरव्या झाडीसह,  निरव मोकळ्या जागी, त्या कातळाशी, दुधाळ नक्षत्रांच्या विलोभनीय वलयात असंख्य तारकामोतीसह अनुभवलेली रात्र.. केवळ केवळ अविस्मरणीय !

३. मनमाड येथील अंकाई टंकाईवर ऐन थंडीच्या बहार मौसमात, मायेच्या उबदार कुशीत निवांत पहुडावं अशी त्या गुहेतील उबदार रात्र आणि रात्री दोनच्या सुमारास.. बोचऱ्या थंडीत केलेली गडफेरी न विसरता येणारी.

४. दुर्गराज राजगडवरील बालेकिल्याशी जननी मंदिरात आणि दुसऱ्या खेपेस पद्मावती मंदिरात शिवरायांच्या सानिध्यात, त्या प्रेरित क्षणासह ..क्षण क्षण जागून अनुभवलेली रात्र..अभूतोपूर्व..

५.  दुर्गदुर्गेश्वर रायगड..
रात्रीच्या सुमारास अवघ्या मित्रांसह एकांत वलयात, समाधी स्थळापासून राजदरबारपर्यंत अनुभवलेली ती शिवमय रात्र..
वाऱ्याची हळुवार झुळूकही शिवरायांच अवतीभोवती असंण ह्याची गवाही देत होती. ते क्षण निराळे होते. भारावलेले..!

६.  मुल्हेर माचीवरील सोमेश्वर मंदिरात..त्या गाभाऱ्यात, चार जणांसह खडबडूंन काढलेली रात्र..

७. धोडप किल्ल्याच्या माचीवरल्या मंदिरात भूता खोतांच्या गोष्टींसह..श्वास रोखून ठेवलेली मंतरलेली रात्र..
8. पदरगडच्या वाटे असता ऐन पहाट वेळी..साडे चारच्या सुमारास धसका घेतलेले ते क्षण असे अजून कित्येक रात्री आहेत. न भुलणाऱ्या..

**********************************************
मनाला मोहिवणारे, वेडावून देणारे हृदयव्यापि क्षण..

सह्याद्रीच्या गड माथ्यावरून..क्षितिजाशी डोळे कान लावून, मनाच्या सुप्त धारेत सूर्यनारायणाच्या जादुई प्रकाश किरणाने रंगवून सजलेल्या क्षितीज छटा पाहणं..हेच ते हृदय व्यापि क्षण…
हा सोहळाच खरं तर आगळा वेगळा असतो. ते शब्दबद्ध करणं हि कठीण.

१)  दहिवली वरून माहितपतगड – सुमारगड करत आम्ही रसाळगडाशी ट्रेकची सांगता केली.
त्या रसाळगडावर.. अनुभवलेले ते मावळतीचे क्षण.., आयुष्यात कधी विसरणार नाही.
अर्धा तासभर आम्ही त्या मावळतीच्या रंगामंध्ये डुबून गेलो होतो. मनाची समाधीवस्था जणू लागलेली. किल्ल्यावर आम्हा चार मित्रांसह इतर कुणी न्हवतं.

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »