वहिनीचा एक दिवस…

वहिनीचा एक दिवस…

काल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड..
संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन रात्री उशिरा पर्यंत हि सुरु असलेली…
वहिनीच्या कामाची लगभग ,धावपळ…काल काहीश्या प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.
जी आतापर्यंत नित्यनेहमी पाहत होतो.

काही कारणात्सव अचानक भाऊ – अन वहिनीला काही बाहेर जाणे जरुरीचे झाल्याने,  कालचा एक दिवस ‘ वहिनीचा’ माझ्या हाती आला. खास त्या करिता सुट्टी घेतली.

सकाळी स्वतः लवकर उठून आमच्या छोट्या राणी सरकारला जागे करून , आंघोळी पासून ते वेणी फणी करे पर्यंत ,त्यांचा मूड सांभाळेपर्यंत नाश्ता पासून शाळेत वेळेत सोडेपर्यंत कामाची धांदल गडबड सुरु झाली . (गंमत म्हणजे आमच्या छोट्या राणी सरकारची वेणी- फणी करताच येत न्हवती.
मुलींचे लांबलचक केस वळविण्याची तशी सवयच नाही आहे म्हणा.
त्यामुळे वरच्यावर हेअर बेंड घातलं कस बसं अन दिली पाठवून शाळेत…) सकाळी ७:३० ची तिची शाळा…

घरी पुन्हा परतल्यानंतर छोट्या राणी सरकारचे छोटे राजकुमार भाऊ , ह्यांना गाढ झोपेतून कसेबसे जागे करत , त्यांना आंघोळ घालून , नाश्ता देऊन , शाळे ला सोडेपर्यंत सकाळचे ११:३० झाले.

घरी परतल्यावर जेवणाच्या तयारीला लागलो . त्यात १ ते दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.
पुन्हा शाळेतून आमचं छोट्या बच्चुंना घरी आण्याची वेळ. पुन्हा तेच घर- शाळा- घर जेवण खावनं , दुपारच शांत पडावं  तर ह्याचं धांगड धिंगाणा सुरु …झोपूच देईना .
त्याना ओरडता ओरडता घसा कोरडा पडे.. . शेवटी काय मुलं ती मुलंच, कसली एक्तायेत एकदा सांगून …..

पुन्हा क्लास ची वेळ , पुन्हा सोडायला एक फेरी … अस करता करता सूर्य मावळतीला आला.
पुढे भाऊ- वहिनी घरी परतल्या नंतर काय तो श्वास मोकळा केला.
हुश्ह … !
कितीही हि धावपळ – पळापळ .
दिवस ह्यातच पटकन कसा निघून जातो . …कळत हि नाही. मग स्वतःसाठी तरी वेळ काय देणार …?

आपल्या कुटुंबात असा सदस्य असतोच. आपल्यासाठीची त्यांची धडपड , कष्ट, ह्याची मोजदाद कधी नसतेच. अन ती करूहि नये. बस्स , त्या मनास कोवळ्या फुलाच्या पाकळ्या सारखं हळुवारपणे जपावं. 
कधी एकत्रित गप्पांत रंगून जावं , कधी चीटूकल्या हास्य गंधात एकत्रित मिसळाव.
 ह्यातच त्यांच्या मनातला क्षीण कुठल्या कुठे निघून जातो.

असंच लिहिता लिहिता ….

– संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.