लोहगड- विसापूर ट्रेक

 

ह्या आकड्यांची गंमतच असते खूप..
सुरवातीस ट्रेकला येणार्यांचा आकडा जरा जास्त असतो. पण हळूहळू तो घसरू लागतो. जसा शेअर बाजारातला निर्देशांक पटकन खाली यावा. तसा..
ह्या ट्रेक बाबतीतही तसंच झालं. सुरवातीला बरेच आकडे होते. पण आदल्या दिवशी पर्यंत आकडा तीन वर आला.
पण काय एकदा का मनात ठरवलेली गोष्ट हि पूर्ण करायची म्हणून आम्ही तिघे मी लक्ष्मण आणि किशोर निघालो.. रविवारी पहाटे ४:३० वाजता घरातून…निघालो एक वेगळी वाट पकडून.
नेहमीप्रमाणे ठाण्याहून पहाटे ६:१५ मिनिटाची इंद्रायणी एक्स्प्रेस न पकडता पहाटे ५:१० मिनिटाने सुटणारी खोपोली ह्या लोकल ट्रेनने आम्ही जायचं ठरवलं . कारण सुखकर प्रवास करायचा होता.
मागच्या प्रवासाचा दांडगा अनुभव होता.

खोपोलीहून मग राज्य परिवहन एसटी ने लोणावळा तिथून मग लोकल ट्रेनने मळवली अन मळवली हून पायी चालत … गडाच्या माथ्यावर ..!
सकाळी ११:०० वाजे दरम्यान आम्ही त्या खिंडीत पोहोचलो.
तिथून मग एक वाट विसापूरला जाते अन दुसरी लोहगड कडे, लोहगड ह्या पूर्वी केला असल्यामुळे मी अगोदर विसापूर करायचे ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही मग विसापूर कडे धावू लागलो.

 

जाताना अनेक करवंदाच्या जाळी पहावयास मिळत होत्या आणि त्यावरील काळी काळी गोड रसाळ अशी करवंद ,ती खाता खाता आम्ही गडावर जाणारी मुख्य वाट सोडून आम्ही दुसर्याच दिशेने पुढे जावू लागलो .
ती गोष्ट काही वेळाने ध्यानात आली. कारण वाट गडाकडे न जाताच दुसरी कडे जात होती.
आम्ही मग मागे फिरलो. .पुन्हा त्याच वाटेने. पुन्हा ती टपोरी टपोरी छोटी मोठी गोड गोड करवंद खात
एका पायवाटेने रानातल्या त्या गर्द झाडीमध्ये, त्यांच्या सावली मधून वाट पुढे काढत दगडांच्या राशी एक एक पार करत ..एका ढासळलेल्या बुरुजापर्यंत आम्ही पोहोचलो.

 
फार फार २० ते २५ मिनिटे लागली तिथपर्यंत पोहोचण्यास, वाट तशी लक्षात येत नाही. कारण उभाच असा कडा आणि ते गर्द दाटीचे रान .

ढासळलेल्या त्या बुरुजापर्यंत पोहोचलो म्हणजे आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलो अस समजायला काहीच हरकत नाही .
पूर्ण गडाला प्रदिक्षणा मारण्यास अन गड पाहण्यास आम्हाला २ तास लागले अन अर्धा तास जेवायला म्हणजे अडीच तास. गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. पण त्या बहुतेक कोरड्याच . गडावर मला आवडलेली वास्तू म्हणजे तटबंदी. भक्कम आणि अजून सुद्धा जशीच्या तशी शाबूत ..

 

दुसरी गोष्ट म्हणजे हनुमांचे शिल्प .
गडावर एक शिवमंदिर आहे. पण तेही पडझड झालेलं..

 
 

पण हे मंदिर नेहमीच चैतन्य निर्माण करतं..
गड पाहून झाल्यावर आम्ही दुपारी ३ दरम्यान पुन्हा त्याच लोहगड विसापूर खिंडीपाशी आलो अन तिथून पुन्हा मग लोहगड कडे मार्गीस्थ झालो .
थोडा लिंबू पाणी वगैरे घेऊन आम्ही गड सर करण्यास सज्ज झालो. सुरवातीस गणेश दरवाजा मग नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा असं करत आम्ही महादरवाजा पार केला .
वर यता येता असं कळलं कि गडाचा दरवाजा हा संध्याकाळी ५:३० दरम्यान बंद होतो .
त्यामुळे आम्ही पटापटा पाउल पुढे टाकू लागलो.
सुरवातीच मंदिर अन मशीद पाहून झाल्यावर आम्ही विंचू काट्याच्या दिशेन निघू लागलो.

तिथे गेलो तेंव्हा एक जोडी उगाच नको ते चाळे करत बसले होते आमची चाहूल लागताच गप्प बसले .
अशा लोकांना अशीच जागा का मिळते ? पवित्र जागेची पवित्रता घालवतात. नको ते चाळे करून,
विंचू काटा येथे जाण्यागादोर मी माझ्या निकोन कॅमेराचा कव्हर कुठेतरी विसरलो.
कुठे पडला कि कुठे ठेवला लक्षातच नाही. त्यामुळे एक मोठ्ठ नुकसान झालं.
एक गोष्ट मात्र ह्यातून शिकलो ते म्हणजे स्वतःच्या वस्तू स्वतः च सांभाळायला हव्यात.
गड पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा खाली उतरलो. आता सायंकाळचे ठीक ५:३० झाले होते .
थोडा वेळ आम्ही पायऱ्या जवळ बसलो. सकाळपासून चालतच होतो.  चालतच होतो. म्हणून जरा पाय दुखावले होते .
अजून एक ते दीड तास मळवली स्थानकापर्यंत पायी जायचे होते.
त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन, आम्ही ५:४५ ला निघालो अन ६:४५ ला मळवली स्थानकात पोहोचलो ते धावत पळत.. कारण ट्रेन फलाटावर आली होती आणि अजून आम्हाला तिकिटे काढायची होती.  अन अजून आम्ही स्थानकापर्यंत पोहोचलो न्हवतो. म्हणून ट्रेन दिसताच पळत सुटलो.
अन ‘विदाउट तिकीट फुल टाईम पास’ ने लोणावळा स्थानकात हजार झालो.
आसपास नजर इकडे तिकडे फिरवत कुणी टीसी नाही ना,  ह्याची खात्री करत आम्ही लोणावळा स्थानकातून बाहेर निसटलो,  ते थेट लोणावळा एसटी स्थानकात.
तिथून मग रात्री ८:०५ ला ठाणे एसटीने खोपोलीला उतरलो अन मग खोपोलीहून रात्री १० च्या लोकल ट्रेनने.. रात्री उशिरा १२ च्या नंतर घरी पोहोचलो .
असा हा ट्रेक..लोहगड विसापूर ..
एका दिवसात आमचे दोन किल्ले पाहून झाले.

– संकेत य पाटेकर
२८.०५.२०१२
सोमवार

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »