रस्त्यावरला बाळ फुगेवाला..

रस्त्यावरला बाळ फुगेवाला..

घरातल्या बंदिस्त चौकटीतून एकदा का आपण बाहेर पडलो कि विस्तारलेल्या त्या नभाशी आपली थेट नजर भेट घडते अन मग मनातले छुपे विचार हि त्या विस्ताराने प्रभावित होवून हळूहळू गतिमान होऊन फोफावू लागतात.
 
संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डोंगर कड्याच्या कुशीत एव्हाना साऱ्यांचा निरोप घेत निद्रिस्थ होऊ पाहत होता. पक्षांची हि ‘काळोखी साम्राज्य’ पसरण्याआत आपआपल्या घरट्याच्या दिशेने ये जा सुरु होती.
 
तसं सकाळपासून घरातल्या चार बंदिस्त भिंतीत बसून आलेला मनाचा क्षीण घालवायचा म्हणून मी हि सहजच घराबाहेर पडलो. अन रस्त्यावरल्या बिन मुखवट्या अन मुखवट्या परिधान केल्याल्या गर्दीशी एकरूप झालो.
 
कधी निखळ हास्य कधी तर कधी खोल विचारात डूबलेले भावगुंतीचे असंख्य चेहरे पाहत..
मनाची अन पाउलांची गाडी,  तीनहाथ नाक्यापासून ते तलावपाळी अस करत पुन्हा घराच्या दिशेने पडू लागली. तेंव्हा येत येता सहज नजर रस्त्यावरल्या फुटपाथ्यावर गेली.
 
‘साहेब’ हा आर्त भावनेने म्हटलेला खरा कि खोटा शब्द तत्क्षणी त्याच दिशेने चाल करून कानाशी येउन धडकला.
रस्त्याच्या कडेला फुटपाथावर, दूरून कुठून खेडा-पाड्यातून मुंबईत दाखल झालेलं..
आई बाप अन छोटी मुलगी असा त्रिकुट असलेलं ते कुटंब..
त्यातले ते दोघे आई – बाप..
आपला बोजा बिस्तर सांभाळत येणा जाणऱ्या हर एकेकाकडे केविलवाण्या भावनेने दयेची भिख मागत तिथेचं पहुडलेलं.
काही मिळेल का ह्या आशेने..
मी हि तिथून जात असता त्यांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला अन ‘साहेब’ अशी आर्त हाक दिली.मी मुद्धाम त्याकडे नजरआड केले अन तसाच पुढे निघून आलो.  म्हटलं रोज अशी कित्येक मंडळी दिसतात..शरीराने धडधाकट असलेली… कां बरं हे भिख मागतात ?

 

त्यांना त्याचं काहीच कसं वाटत नाही. ? अन आपण का बरं त्यांना भिख द्यावी?

मुळात भिख अन भिखारी हे शब्दच लाजिरवाणे आहेत.

असो,

परिस्थिती हि कुणावर सांगून येत नाही. पण हल्ली हे जरा जास्तच झालंय म्हणायचं. घाम न गाळता पैसे मिळविण्याची धडपड ..

मन अश्याच विचार चक्रात गुंतले होते. चालत होते.नि तोच पुढे, रस्त्यावरल्या एका दुकाना शेजारी.. हास्य हरवलेला एक छोटा निरागस मुलगा ..

रस्त्यावरला बाळ फुगेवाला.. साधारण ९-१० वर्षाचा, हाती काठी घेऊन त्यावर टांगलेल्या, विविधरंगी फुग्याकडे एकवार पाहत,  रस्त्यावरल्या येणाऱ्या – जाणाऱ्यांकडे अगदी आशेने ते घ्यावे म्हणून विनवणी करे, पण कुणीच घेईना म्हणून व्याकुळतेने तसंच पुढे चालत राही.

त्याचं ते अनवाणी चालत राहणं अन चेहऱ्यावरचे निपचित व्याकुळतेने कळकळलेले भाव हृदयास भिडले खरे …

एवढ्याश्या वयात पोटा पाण्यासाठी सुरु असलेली त्याची वणवण, खटपट..

ते एकंदरीत दृश्य माझ्या अंतकरणाला ‘काहीतरी कर रे’ फुकट नाही पण त्याच्या कष्टासाठी’ तरी,  ह्यासाठी विनवणी करू लागलं. भुकेने कासावीस झालेलं त्याच कोवळ मनं..अंतकरणाला जावून भिडत होतं. पण माझे हाथ थिटे पडत होते.

अजूनही हाथ थिटे पडतात

काही देण्याच्या हेतूने…

हि काही दिवसापूर्वीच लिहिलेल्या चारोळीतील दोन ओळी मनात वेगाने घुमू लागल्या. पाय त्यातच पुढे चाल करू लागले. एक विनाकाही कष्ट करता पोटा-पाण्यासाठी हाताची झोळी करत आशेने बघणारे लोकं अन कष्ट करून वणवण भटकून स्वकष्टाने आपली भूख भागवणारे लोकं अशी तुलनात्मक विचारांची घडी मनाच्या खोलीत फिरकी घेऊ लागली.

आपण त्या मुलाला काही तरी मदत करायलाच हवी.  ह्या निर्धानाने चालते पाय जागीच थांबले, शोधार्थ नजर इकडे तिकडे वळू लागली.

No one has ever become poor by giving …हे कधीतरी कुठेतरी वाचलेलं वाक्य तितक्याच मनावर आरूढ हि झालं. अन त्या मुलाच्या दिशेने मन धावू लागलं.

तो बाळ फुगेवाला एव्हाना बराच पुढे गेला होता. त्याचा मागोवा घेत पाउलं एका ठिकाणी थांबली.  माणुसकीचा अनमोल साठा अजूनही आपल्या समाजात शिल्लक आहे तर  ह्याचा पुरावा आज पुन्हा मिळाला.

एक सुशिक्षित बाई आपुलकीने त्या बाळ फुगेवालाची चौकशी करत..काही हवाय का ? अशी विचारणा करत होती ? त्याने हळूच मान डोलावली.

एक बिना बर्फाचा उसाच्या रसाने भरलेला एक ग्लास त्याच्या कोरड्या ओठावरती फेसाळ होवून गटा-गटा गायब हि झाला. तहान भुकेने व्याकूळ झालेलं त्याचं मन काहीस तृप्त झालं.

पण हाती काठी असलेल्या त्यावर विराजमान होवून डोलणाऱ्या विविध रंगी फुग्यांचा प्रश्न अजून हि सुटलेला न्हवता.  त्याच्या पोटा पाण्याचा खरा प्रश्न तो …

म्हणून त्याकडील विविधरंगी फुगे.. त्याची विचारपूस करत करतच ‘ एक एक मी विकत घेतली. अन त्यास अधिकचे काही पैसे देऊ केले. पण त्याचं कोवळ पण सशक्त अन प्रामाणिक मन हि असं कि अधिकचे पैसे पुन्हा करावे म्हणून त्याने माझ्याकडे एक वेळ पाहिलं अन हात पुढे केले. तेंव्हा मन काहीसं गहीवरलं. हळूच पाठीवरती हात थोपवून मी राहूssss दे रेsss असं म्हटलं अन आम्ही दोघे आप आपल्या वाटेने निघून गेलो.

पण विचारांची हि घंटा पुन्हा घन-घन करू लागली. पोटा-पाण्यासाठी फुगे विकून वणवण फिरणारा तो एवढासा मुलगा अन काहीच न करता काही मिळेल ह्या आशेने पाहणारं ते त्रिकटू कुटुंब, त्यातले ते दोघे आई बाप …ह्यातील फरक करत..

खरं तर असं कुणी दिसलं कि मन कासावीस होतं. त्यात कुणी लहानगा असेल तर काय बोलावं? एकीकडे अन्नासाठी म्हणून वणवण फिरणारे  अन एकीकडे अन्नाची नासाडी करणारे …हे चित्र कधी पालटणार ?

रस्त्यावरला बाळ फुगेवाला..

असंच लिहता लिहिता ..

संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.