‘येवा कोकण आपलोच असा”
नारळी फोफळ्यांच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी.
‘येवा कोकण आपलाच असा’ ….हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरतं.
निसर्ग देवतेचं वरदहस्त लाभलेला हा सिंधूदुर्ग जिल्हा..
पावला पावला नजीक त्याच्या अलौकिक सौंदर्याचा – ऐतिहासिक घडामोडींचा प्रत्यय घडवून देतो.
नारळी पोफळीच्या बागा मध्ये लपलेलं हे कौलारू घर /कार्यालय- देवभूमी देवबाग

नितल स्वच्छ मानवी वर्दळ नसणारे.. निवांत असे सागरी किनारे, तना मनात चैतन्याचा नवा साज फुलवणारे गतीवान वारे, पाहताच क्षणी छाती अभिमानाने प्रेरित होऊन फुलुनी यावी असे ऐतिहासिक बेलाग भक्कम जलदुर्ग.
(शिवरायांच्या दूरदृष्टीने साकारलेला मालवण किल्ला – सिंधुदुर्ग)

श्रद्धेच्या अथांगतेने दोन्ही कर एकत्रित जुळुनी यावे अन माथा नकळत देव देवितांच्या चरणी झुकुनी जावे असे सुरेख- सुबक – प्रशस्त अशी कलात्मक मंदिरे ..

एकीकडे अथांग पसरलेला सागर दुसऱ्या बाजूला कर्ली खाडीचा संथ प्रवाह आणि त्या दोहांचा चंद्र सूर्य ताऱ्यांच्या साक्षीने नित्य नेमाने होणारा सुरेख संगम.
सृष्टी सौंदर्याचा अनोखा मिलाफच म्हणावा असा हा देवबाग .
कोकणातील विविध पारंपारिक अशी संस्कृती…
काय काय पाहिलं आम्ही..त्यापेक्षा काय नाही पाहिलं आम्ही .
कोकण मनी भावला तो असा..
‘येवा कोकण आपलोच असा”
भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची
– संकेत य पाटेकर
‘येवा कोकण आपलोच असा”

कुठल्याही वाटेवरचा प्रवास…हा नेहमीच नवं काही मिळवुन देत असतो. जोडून देत असतो. आयुष्यात इतर काही नाही..पण ‘प्रवास’ हा हवाच. जवळचा असो वा दूरचा..आपली प्रतिमा आपल्यालाच नव्याने तो दाखवत असतो. – संकेत
– रॉक गार्डन मालवण
‘येवा कोकण आपलोच असा” / Yeva Konkan Aaploch Aasa