तुला १०१ उठा बश्या काढाव्या लागतील हा ..

मी म्हटलं ठीकायं , पण त्या मोबदल्यात मला काय मिळेल हं ?

ती म्हणाली : पनीर चिल्ली ,
मी म्हटलं वाह …छानच ! माझी आवडती पनीर चिली मिळणार तर ..!
हम्म …
मग … आधी उठा बश्या काढ चल , तिने लगभगिने म्हटलं.
मी म्हणालो ..फोन वरून कुठे गं , तुला भेटल्यावर , तुझ्या समोरच , उठा बश्या काढेन की ..!
ती म्हणाली ..ओके ,
मग भेटू आपण उद्या …
मी म्हटलं बरं ….
बरेच दिवसाने मैत्रणीचा असा फोन खणाणला होता. पण जरा रागारागानेच …त्यातला हां गोड मधाळ संवाद. म्हणावं तर रागातही मधाळता साचलेली.
मैत्रीच्या नात्यातलं आमचं हे आपुलकी अन प्रेमस्नेहाने जुळलेलं एक नातं.
मोजुन् म्हणायच्या तर मला मोजक्याच् अश्या मैत्रिणी, स्नेह राखूनअसलेल्या .. त्यातली ही एक वेडू…
स्वभाव गोड , निरागसता मनाशी ठासून भरलेली. माझ्याइतकीच हळवी पण ज़रा नाजूक अशी,
चांदण्याच्या शीतल ते प्रमाणे सौम्य …
आमचं मैत्रीचं नातं ही असंच निर्मळतेच्या झऱ्यावानी ….वाहतं. खळखळत.
गेले कित्येक वर्षांपासून…भावगंध जपुन असलेल.
पण मागील काही दिवसापासून तिच्याशी संपर्क न्हवता . ना भेट, ना संवाद. ना काही ..
म्हणावे तर मीच जाणूनबुजून करत होतो सगळं . संवाद वगैरे टाळन…
गंमत म्हणून पहावं म्हटलं …
ही स्वतःहून आठवण काढतेय का ? फोन करतेय का ?
कारण लग्न झाल्यापासून वा त्या आधी पासून एक भेट न्हवती . तिच्या लग्नालाही तसे चार पाच महिने ओलांडले होते . म्हणून म्हटलं बघूयाच…
जरा खेळी करून ..काही दिवस संवाद टाळून …
बघूच …स्वतःहून कॉल येतोय का ?
आणि अश्यात तिचा कॉल खणाणला आणि क्षणभरात मनाशी स्तब्धता पसरली. शांततेला एकाकी उधाण भरलं .
विसरलास ना ?
मी म्हटलं नाही, मी कसा विसरेन .
तूच मला विसरलीस , हो ना ?
बाबू …. ( प्रेमाने कधी बाबू म्हणेल…कधी जाड्या , कधी काय नि काय ,मनात येईल ते विशेषणे असतात माझ्या मागे .  )
मी ………..हॉस्पिटल मध्ये होते …
वर पोहचण्याच्या स्थितीत,मरणोत्तर अवस्थेत..आणि
वरतून तू मला सांगतोय , विसरलास म्हणून …
तिच्या अश्या बोलण्याने क्षणभर मी स्तब्ध झालो . काय बोलावं ते कळेना.
नको तिथे उगाच शब्द संवाद टाळून…..फार मोठी चूक केली होती.
का असं मी वागलो ?
कुठेशी माझंच लिहलेलं वाक्य माझ्याच मनाशी घेर करू लागलं होतं. 
गैरसमजुतीचे धागे आपणच आपल्याभोवती गुंडाळतो.. संकेत. आणि हा धागा तू गुंडाळलायस .
गमतीतं ही म्हण, पण आपलेपणाच्या नात्यात अशी खेळी कधी करू नकोस .
संवाद हा नात्यातला दुवा . तोच जर नसेल तर नातं ही नसल्याप्रमाणे आहे रे पडीक.
समजतोयस ना ,
दिव्याच्या ज्योती प्रमाणे नातं असतं रे, संवादाची दिव्य ज्योत जोपर्यंत जळत असते .तोपर्यँत नातं प्रकाश दीपाने उजळत राहतं. ती ज्योत एकदा मिटली की , मग उरतो तो केवळ काळाकुट्ट अंधार.

म्हणूनच सांगतोय , ‘ संवादाची ती ज्योत अखंड तेवत ठेव. जाणिवेच्या अथांगतेतून ..’
तसे आपण क्षणभराचे सोबती असतो . ह्या जीवनाचं कधी कुठे कधी सांगता येतयं ?

मृत्यू अटळ आहे , कुठल्या पावलांनिशी कुठून कसा तो येईल ते ही ठाऊक नसतं. मग आपलेपणाने जोडल्या गेलेल्या ह्या नात्यांशी असा खेळ कशाला ?आणि का ? कशासाठी ?
क्षणभराच्या ह्या आयुष्यात ही नाती आणि नात्यातला जाणिवेतेचा अनमोल ठेवा , तो सहवासीक गंध …
प्रत्येकाला जपायला हवाच.
तो …तू ही जप आणि वपुंच्या शैलीत म्हणायचं तर आयुष्याचं महोत्सवं कर ….
शब्द संवाद असा मनाशी सुरू होता. चूक उमगली होती.
कळकळीने सॉरी म्हटलं गेलं. माफी मागितली .
पण ती ..
सॉरी अजिबात चालणार नाही .
तुला १०१ उठा बश्या काढाव्या लागतील हा ..
तिच्या अश्या लाडिक बोलीने पुन्हा हास्य उमललं गेलं .
पण मनाशी अजूनही विचार चक्र सुरू होतं.
हृदयाशी जोडलेलं मनाशी जुळलेलं आणिक एक अनमोल नातं …….कुठेशी संवाद हरवून आहे…. संकेत..
जरा लक्ष दे …!
मनातलं काही …
संकेत य पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.