मल्हारगड ..

मल्हारगड ..

मल्हारगड ..

समुद्रसपाटीपासूनची साधरण ११०० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला, अगदी छोटेखानी पण देखणा आणि पाहण्यासारखा आहे. मुंबई पुण्यापासून एक दिवसात हि करता येतो .
फार वर्दळ नसल्याने, किल्ल्यावर निवांत मनाजोग भटकता येतं.

मराठ्यांच्या इतिहासातील, महाराष्ट्रातला बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ट्रेकर्स मंडळींमध्ये हा नावाजलेला आहे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख ‘सरदार पानसे’ ह्यांनी हा किल्ला बांधला. दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी.
थोरले माधवराव पेशवे ह्या किल्ल्यावर येऊन गेल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येते. . तसेच तेजोमय क्रांतीची मिशाल पेटवणारे इंग्रजाविरुद्ध लढा देणारे, उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. असा एकंदरीत ह्या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात मांडता येतो.
हे झालं इतिहासाचं अन भूगोलाचं ..आता आपण वर्णना कडे वळू..

शनिवार, गोकुळाष्टमीसारखा कृष्णमयं दिवस. त्यात अश्या मंगलदिनी, योगायोगाने जुळून आलेला मित्राचा वाढदिवस , अन त्यात ठरलेली आमची हि मल्हारगडची ट्रेक सफर.
एकंदरीत सगळा योगायोगाच …
जवळजवळ एक महिन्याच्या दीर्घ कालावधी नंतर सह्याद्रीत असा हुंदडण्याचा हा योग जुळून आला होता . हा सह्याद्री म्हणजे आमचा जिवाभावाचा सवंगडी, नवा ध्यास-नवी उर्जा , नवी प्रेरणा , नवं तेज ..नवी दिशा. त्याच्याच सानिध्यात त्याच्या सोबतच ह्या ‘जीवनाला’ ह्या ‘जगण्याला’ नवा ‘अर्थ’लेप द्यायचा आहे.
हे जीवन आपलं बहुमुल्य आहेच. त्याचं सार्थक तर झालेच पाहिजे , ना ?
सह्याद्री त्याचीच जाणीव देतो. अन त्यासाठी नवी उर्जा हि , प्रेरणा हि ..
तर असो ..
(कोकम सरबत अन केक )

आठ जणांचा आमचं टाळकं , गोकुळाष्टमी अन मित्राचा वाढदिवस एकत्रित आणि दणक्यात साजरा करत,
पुणे – मल्हारगड दिशेने निघाला. तेंव्हा मध्य रात्रीचे एक का दीड वाजले होते.
रस्त्याला फारशी रहदारी न्हवती. मोकाट रस्ते सुसाटलेले.
काळोख्याचा पसारा सर्वत्र अंधारलेला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या, उंच इमारतीतल्या ‘ऑफिस’ चे दिवे तेवढे, पेटते दिसत होते.
सारं जगं निद्रा अवस्थेत पहुडलेलं असताना, कुणीतरी अद्यापही तिथे अहोरात्र काम करत होतं.
निद्रा देवतेला जागता पहारा देत. जीवनाचा किती हा संघर्ष ..न्हाई !
असो..
गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. मुंबई पुणे एक्प्रेसने गाडी सुसाट धाऊ लागली . तसा वातावरणात फरक जाणवू लागला. गारवा हळूहळू वाढत होता . कुडकुडनं चालू झालं होतं .
एके ठिकाणी वाफाळत्या चहाची तलफ भागविली. अन पुन्हा नव्या उर्जेसह गाडी आणि आम्ही पुन्हा वेगवान झालो. थोड्या गप्पा पुन्हा रंगात आल्या. मस्ती गाणी सुरु झाली.
त्यातच मुंबई पुणे एक्स्प्रेस हाईवे सरला . आम्ही पुणे शहरात प्रवेश केला.

हडपसर मार्गे गाडी धावू लागली आणि हळूहळू दिवे घाटाचा वळणा-वळणाचा रस्ता आमच्या स्वागताला तयार झाला.
ह्याच दिवेघाटाच्या आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी, मल्हारगडची उभारणी झाली होती. अन अश्या ह्या ऐतिहासिक आणि पावित्र्य ठिकाणी..पहाटेच्या गारव्यात , पाचच्या अंधुक धूसर रात्री, आम्ही मल्हारगड दिशेने वाटचाल करत होतो.


मी आणि निलेश आम्ही दोघेच काय ते जागे होतो. निलेश ड्राइव्ह करत तर मी नभांगणातल्या चंद्र्कोरीच्या शितलमय छायेत न्हाऊन घेत होतो .
ती अर्ध चंद्रकोर अन त्या भोवताली पांढरया पुंज्क्याची ती वलयांकित रेखा, अन त्या अंतरी लुकलुकता तारकांसमूहचा दिव्यत्वाचा खेळ ..
वाह..!

असा क्षण मी कधी पहिलाच न्हवता. डोळे दिपून जात होते. एका वेगळ्याच दुनियेतुनी आपला प्रवास सुरु आहे. असा भास पदोपदी जाणवू लागलेला . निसर्गाची किती हि अद्भुत रूपं..न्हाई !
स्वतःशीच बडबडत ..वेडावून गेलो होतो. मित्रांनीही ते क्षण आपलेसे करून घ्यावेत, ह्या साठी मन झगडू लागलं होतं,  पण सारेच निद्रेच्या स्वाधीन होते. त्यामुळे तो प्रयास मी तिथेच सोडून दिला. अन पुन्हा त्या दुनियेशी एकरूप झालो.
रात्र हि अशी …अविस्मरणीय असते. ह्याचा प्रत्यय पुन्हा आला. सह्याद्रीतली अशी रात्र मला नेहमीच भुलवून टाकते.
तर असो ..

गाडी त्याच वेगाने पुढे सरत होती.
साधारण सहाच्या आसपास आम्ही सोनोरी गावात प्रवेश केला.
दिवेघाट उतरत्या क्षणीच काही अंतरावर झेंडेवाडी अशी पाठी दिसते. तिथूनही किल्ल्यावर जाता येते.
पण ती वाट थोडी लांबीची म्हणून आम्ही सोनोरी गावाच्या दिशेने येउन पोचलो.
गावातूनच किल्ल्याशी जाण्यास कच्चा रस्ता आहे . आम्ही तिथवर पोहचलो.
तेंव्हा अंगातला आळस (झोप )आपोआप गळून पडला. सॅक पाठीशी घेतली. कॅमेरा हाती घेतला.
समोरच किल्ला खुणावू लागला. दुसरीकडे पूर्वक्षितिजाशी अरुणोदय…
त्याच्या आगमनाच्या रंग छटा सर्वत्र गंधाळू लागल्या. तसं मनोमन वंदन करत आम्ही आमच्या दुर्ग भ्रमंतीस सुरवात केली .

 
उजळूनीया आले.
 
 
 

किल्ल्याच्या दिशेने   …

 
फुलोरा ..
 
मित्र सवंगडी ..
 
एक उनाड क्लिक ..
 

आपल्या प्रेरित इतिहासाची शौर्य गाथा ऐकवून, अंगी तेजोवलय भिनवणारे हेच ते तटबुरजं.

अद्यापही, तितक्याच खंबीरपणे निसर्गाच्या वादळी संकटाशी लढतायेत .

बुरुज..

आपल्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर, ह्या कडे-कपाऱ्यातून, कधी हि कुठेही फिरा. भटका. 
तुम्हाला एखादं तरी टुमदार असं राऊळ अन त्याचा कळसावर..कधी उंच आकाशी , अभिमानाने फडकत असेलली, ‘ भगवी पताका नक्कीच उंचावलेली दिसेल.
हि सारी आपली दैवतं खरी ..म्हणून त्याच भाविकतेने नकळतपणे आपले कर हि, त्यापुढे जोडले जातात. ”श्रद्धा भाव जिथे कर जोडती तिथे”

सह्याद्रीच्या माथ्यावरील हि देवस्थाने म्हणजे..एकांतात गवसलेल्या चैतन्याचा नवा सप्त सूर..
मल्हारगडावरील असच एक छोटसं महादेव मंदिर..

खंडोबा मंदिर..

सह्याद्रीची कड चढताना …गड किल्ल्यातील तट बुरुजांचा, अन दरवाजांचा असा बळभक्कम नजराणा दिसला कि उर अभिमानाने नक्कीच भरून येतो. मल्हारगडावरील असाच, वर्षानुवर्ष अभिमानाने चौकी देत उभा असलेला हा.. बालेकिल्ल्याचा दणकट प्रवेश द्वार .

मुख्य प्रवेशद्वार ..

किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा फारच देखणा अन भव्य आहे. त्याचीच एक छबी … दरवाजा येथून टिपलेली…

सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून मनमुराद वावरताना ..आपला विविधअंगी घटकांशी संबंध येतो.
त्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तिथला ‘माणूस’
दळणवळणाच्या सुखसोयी अपुऱ्या असताही, तृप्त असणारा , समाधानाची मिश्किल हास्य रेषा चेहऱ्याशी झळकावत, मुक्तः कंठे जीवन व्यतीत करणारा.. हा साधा सरळ , मनमिळाऊ आणि कष्टाळू माणूस, आपल्या खोपटी वजा घरात काही असो नसो , पण यथोच्छित आदरतिथ्य करणारा..
”या बसा.. चहा घ्या ” जेवून जा , असं म्हणत सुवासिक गप्पा मारणारा ..त्यात दंग होणारा हा माणूस.
पाऊस हाच त्याचा मायबाप ..त्यावरच त्याचं सारं गणित जुळलेलं, म्हणूनचं व्याकूळ आणि आशावाळ नजरेने, आकाशी त्या मेघ राजाला तो खुणावत असतो.
बरस रे …बरस ..आता तरी,
पण त्याची हृदयवेडी हाक त्यापर्यंत पोहचते का ?
हीच कळ ह्या आजोबांच्या हृदयातून हि पाझरली. बोलता बोलता, यंदा पाऊस नाही,
मल्हारगड उतरतेवेळी, निवांत एका ठिकाणी..हे आजोबा विसावलेले दिसले.

नाव – श्रीकांत काळे – सोनोरी गाव.
तेंव्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधला तो क्षण ..
सह्याद्रीत भटकताना हि माणसं नक्कीच भेटतात . कधी स्वताहुन ती आपल्याशी संवाद साधत आपलंस करून जातात, तर कधी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं .
खूप काही मिळतं हो, प्रेम आशीर्वादासहीत..

गड माथ्यावरील बुरुजावरून वा अश्या दरवाज्यातून .. दूरवरचा परिसर एकटक न्याहाळनं म्हणजे..
इतिहास -भूगोल ह्याचा मिलाफ अन सोबत निसर्ग सौंदर्याची गोडी..
गड किल्ले हे असे निवांतच फिरावेत..पाहावेत..समजून घ्यावेत.

शान आपुला, अभिमान हा आपुला.. ‘भगवा’

जय शिवराय ..

 भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..! 
आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळ्वा  ..
 – संकेत पाटेकर 

0 thoughts on “मल्हारगड ..

Leave a Reply

Your email address will not be published.