मनाचे आर्जव..

ह्या मनाचे देखील किती हे ..आर्जव… 

नको नको म्हणतो , तरी देखील स्वतलाच सावरतं , विश्वास देत ते म्हणतं ..बघ रे , 
पुन्हा एकदा प्रयत्न करून ….वातावरण काहीसं निवळल असेल आता…
बरेच दिवस झाले रे….बोललो नाही. 
भेटलो नाही , कुठलाच संवाद नाही. हा नाही कि हु नाही .
निशब्दी मनाचे गहिरे अन दाह उसवणारे वारे फक्त वाह्तायेत. 
त्याचाच हा परिणाम अन होणारा त्रास … म्हणूनच रुकरुक लागले रे, शांत राहवत नाही. 
चीड चीड होतेय नुसती मनाची ,संयम हि तुटू जातोय. तरीही स्वतःला सावरत मी पुन्हा प्रयत्न करतोय…..

नातं अन दुरावलेलं मन जर आपल्या पुढाकारानेच , पुन्हा जुळत असेल किंव्हा जुळणार असेल तर, प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे ना ? 
अस स्वतःला बजावत मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, पण किती वेळ रे , कितीदा ? मर्यादा नावाची देखील रूपरेखा असते कि नाही? 

कधी कधी खरच प्रश्न पडतो कि ज्याच्यावर जीव ओवाळाव . प्रेम करावं , ते इतके भावनाशुन्य , भावना कठोर कसे काय होतात ? 

कधी काळी आपल्याशीच मनमोकळे पणाने वावरणारी , न राहवून स्वत:हून संवाद साधणारी ,आपल्या काळजीत वेडीपीसी होणारी अन वचन बद्ध असणारी अन आपलीच म्हणून जवळ केलेली आपली हि लोकं , अशी कशी बऱ वागू शकतात ? प्रश्नावर प्रश्नांचे एक एक इमले रचले जातात . 

उत्तर मात्र असूनही नसल्यासारखं अन नकोसच वाटतं.
किती रे उरलो आपण त्यांच्या जीवनात , काय उरलेय किंम्मत आपली ? 
आणि नेमकं असं काय घडलंय इतकं कि ज्याने आपल्याला साफ दूर्लक्षिलं जातंय ? का ? 
ते नक्की कळत नाही . समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नाही . 

पण आपली धडपड एकतर्फी चालू असते … आज ना उद्या …….काहीतरी घडेलच , मनासारखं .., ह्या आशेवरच…
पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा मन निराशेच्या डोहात ढकलल जातं . 

अन वेदनेला नवां अंकुर फुटत जातो. हताश होवून जातो आपण .., डोळ्यावर एकाकी अंधारी यावी तसा काहीसा अंधार पसरतो .
दोष तरी कोणाला द्यावा , न्हाई ?

समोरच्याला कि स्वतःला , कि बदलेल्या ह्या परिस्थितीला , कि नशिबाला ? कळत नाही. 
तरीही आपण म्हणतो दोष नकोच ना कुणाला द्यायला . का द्यावा ?
पण कुठेतरी शेवट मात्र असतोच . पूर्णविराम द्यावा लागतो . 
जर हे असंच चालू राहील तर …..
कारण संयमाला देखील मर्यादा असतात. आपल्या उदारत्या प्रेमाला नसल्या तरी .., कारण प्रेम हे आजीवन असतं . त्याला मरण नाही. अंत नाही . संयमाच मात्र तसं नाही. त्याला हवा तो प्रतिसाद मिळाला तर तो टिकून , अन्यथा ते लुडबुड करतं…

अन शेवटी मनाला गुण गुणाय लावतं. 
अपनी अपनी जिंदगी है भाई , अपने अपने रास्ते..और अपनी अपनी मंजिले ! 
– संकेत य. पाटेकर 
०५.१२.२०१५


Leave a Comment

Your email address will not be published.