‘भोरप्याचा ईमानी बल्लाळ’

सर्वप्रथम अभिप्राय देण्यास मी इतका विलंब लावाला त्याबद्दल खरंच मनापासून क्षमस्व.☺️
स्वतःच्याच दुनियेत कायमच मश्गुल असल्याने आज उद्या करत हे लांबणीवर गेलं खरं…
पण अभिप्राय द्यायचा म्हणून केवळ द्यायचं न्हवतं.
मनातले उत्कट खरे भाव उतरवायचे होते. ज्याला मुहूर्त इतक्या महिन्याने आज मिळाला.

आज पाच एक महिने उलटून गेले असावेत. त्या दिवसाला, मंतरलेल्या त्या दुधाळ पोर्णिम्या रातीला…भोरप्याच्या सानिध्यात तुझ्या बागडत्या नजरेतून आकार रुपास आलेल्या आणि पुस्तकीयं रूपातून नव्याने जन्म घेतलेल्या त्या कथेला.
”भोरप्याच्या ईमानी बल्लाळाला..”

मी स्वतःला नशीबवान म्हणेन, तुझ्यासारखा कवी आणि लेखक मित्र म्हणून मला लाभलायं आणि ज्याच्या पहिल्या पुस्तकाला म्हणजे बिल्वपत्र आणि ह्या दुसऱ्या पुस्तकाच्या लोकार्पणाला दोन्ही ठिकाणी मी उपस्थित होतो. हा आनंदच कैक मोठा आहे.

‘कल्पकता आणि जाणतं संवेदन मन’ हे ज्यांच्याकडे तो निसर्गाच्या प्रत्येक सजीव निर्जीव घटकांकडे कुतूहलाने पाहत रहातो. आणि त्यानुसार घडवत राहतो स्वतःला आणि त्यातून समाजमनाला ही..

ती भव्य दृष्टी तुला लाभलेयं. लाभलेयं म्हणण्यापेक्षा ती तू जपलेस असं मी म्हणेन…
त्यातूनच हा ‘भोरप्याचा इमानी बल्लाळ’ आमच्या समोर खुद्द चालता बोलता झाला. भोरप्याचा अंगा खांद्याशी कैक प्रश्न घेऊन बागडताना आणि घडताना आम्ही त्याला पाहू शकलो. ..
तुझ्या नजरेतून.. तुझ्या सहज सुंदर लेखणीतून..

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्र भूमी. ही सहयाद्री भूमी. ज्यात हे गड कोट म्हणजे आपला सन्मान आपला सर्वोच्च अभिमान.

ह्या अश्या धर्तीवर…
एखाद इथलाच धागा पकडून, चौफेर नजरेच्या कमानीनं, मनाचं खुर उधळून, कल्पकतेचा जोरावर लिहलेली ही कथा..कादंबरी
वाचायला घेतली की चैतन्य सळसळू लागतं.
सृष्टीतला प्रत्येक घटक जणू धोंड्यारुपी आपल्यातूनच बोलायला सुरुवात करतो.

कधी अभंगगाणी कधी श्लोक म्हणू लागतो.
कधी रानभर उंडरताना, बेडकीच्या उंचपुऱ्या उड्या पाहून, स्वतः स्वतःला प्रश्न करताना पाहतो.
बायलीला कसं काय जमत असंन ?

सातभाई’चा थवा अंगणात उतरलेला असताना.. गुणजीच्या प्रश्नाला, आबा हे एकत्रच का फिरतात ? ह्याचं उत्तर देताना,
ये , गुणा येडा काय तू ? ते समदे भाव हायेत. मग एकसातच फिरणार ना !!
असे बालसुलभ ऊत्तर देताना दिसतो.

कधी आईच्या कुशीत…, आपले भाबडे प्रश्न घेऊन,
यशोदेचं गाणं ऐकताना दिसतो..

माझ्या यशोदेचं जीनं
जीनं कुनाला कळेना
बाळ लुचतं छातीला
तिचा पाझरितो पान्हा.

वाचताना आपण आपल्या बालपणीतच हरखून जातो. तिच्या (आपल्या माऊलीच्या)मायेच्या स्पर्शभरल्या आठणीने..स्मृतिगंध होत.

पालीच्या बल्लाळेश्वरावर अपार श्रद्धा असलेली रुकमाई… आपल्या मुलाचं नाव बल्लाळ ठेवते आणि प्रेमानं धोंड्या म्हणू लागते. आक्खी ठाकूरवाडी त्याला धोंड्या म्हणूनच नावजते.
असा हा धोंड्या..

रानावनात बिनधास्त मोकाट उनाडणारा धोंड्या..
निसर्गाशी कौतुकाने हितगुज करणार धोंड्या..
शिवबाच्या स्वराज्यात मावळा होण्याचं स्वप्नं उराशी बांधून असलेला धोंड्या..
जिवाच्या तालमीत युद्धकलेत निपुण होणारा धोंड्या..
पहाटेच्या स्वप्नात…शिवाजी राजाचं दर्शन घेणारा धोंड्या..
शिवाजी राजाची शपथ घातल्यावर ..चाफ्याची रोपटं देणारा धोंड्या…
”मी कामगिरी करून दाविल तवा रडू नकोस” असं सांगून जीवाचं जीव पिळवून देणारा धोंड्या…
प्राणपणानं दरोडेखोऱ्यांशी लढता लढता अखेर वीरमरण आलेला धोंड्या..
भोरप्याच्या सानिध्यात चिरशांती घेणारा धोंड्या…

धोंड्या वाचता वाचता काळजात स्थिरवतो, तो असा..
कधी सुधागडला जाल तेंव्हा हा धोंड्या हमखास नजरेस पडेल.
फारच सुंदर आणि उत्कृष्ट झालंय सुरज…
अवश्य वाचा तुम्ही सुद्धा..

‘भोरप्याचा ईमानी बल्लाळ’
लेखक – सुरज उतेकर
प्रकाशक : स्वय प्रकाशन
मूल्य : १४९ /- फक्त
संपर्क – सुरज उतेकर
– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.