ऐकssss ना…..त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ ?
किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ?
बघतो आहेस ?
हो ?
असं वाटतंय…मी जगावेगळ्या स्वप्नं नगरीतच वावरतेयं रेsssss… किती भन्नाट जग आहे हे !
मी असं कधी अनुभवलं नाही ह्यापूर्वी…
हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र, हा नदीचा संथ नितळ प्रवाह ..तो चंद्रमा, त्याची शुभ्र हळवी शीतलता , झाड फांद्यांची हि स्थिरता- अस्थिरता, तना मनाला भाव रंगात ढकलून देणारा हा मंद गार वारा आणि आपण दोघे..
तेही एकटे आणि सोबत हि निःशब्दता..प्रेम रंगला अधिक गडद करणारी..
कायssss वाटतं रे तुला ?
ह्या अश्या ऐकून वातारणाकडे पाहून ..
तुझ्या शब्दात वीण ना काही ?
मला ऐकायचं आहे, तुझ्यातल्या लेखक अन कवी मनाकडून ..
इतका एकांत आजपूर्वी कधी मिळालाच न्हवता अन अन अशी नामी संधी हि …
सांग बरं आता ?
चेहऱ्यावरती मंद हास्य उजळून, त्याने हळूच तिच्याकडे पाहिलं . तिच्या चेहऱ्यावरची निरागसता अन कुतुहूल वाढीस लागलेलं. प्रेम रंगाच्या धुंदीत ते रसिक सुवासिक फुल हळुवार डवरलं जात होतं.
त्याने अधिक वेळ न घेता शब्द मोहायला सुरवात केली .
इतकं छान वर्णन केले आहेस तू ? मी आणिक काय बरं सांगणार ?
तू जे पाहिलेस वा पाहते आहेस नं, तेच मी हि पाहतो आहे . पण माझा रोख त्या नदीतल्या संथ प्रवाहाकडे आणि त्यात स्थिरावलेल्या त्या चंद्रमाकडे अधिक लागून आहे.
का बरं ?
हि संथ वळण घेत वाहणारी नदी आणि तो वर मैलो दूर असलेला चंद्र …..पाहतेस ना ?
हो ,
काय बरं नातं असावं दोघात ?
मैत्रीतलं प्रेम कि प्रेमातली मैत्री ?
सूर्य मावळतीला लागल्यावर, हि नदी हि कशी, बघ… संथ रूप धारण करते. दिवसभरातला तो खळखळाट , आलेला शिणवठा आदी , त्या निरव शांततेत ढवळून जातो . ती संथ होते. एकपात्री होते.
स्वतःला मोकळं करुण घेत .
तारुण्यसुलभ एखाद स्त्रीने आपला केशसंभार मोकळा करावं ना तसंच . ..ती हि मोकळी होते.
आणि तेंव्हाच दिवसा लपंडाव खेळणारा हा ‘चंद्रमा’ तिच्या ‘हृदयी ‘मोकळा असा श्वास घेत स्वतःला हळूच सामावून घेतो. तिच्या गर्द मिठीत , तिला घट्ट बिलगून, श्वासाचं जाळं विस्तारत.
ती प्रेमवेडी हि ह्याच क्षणांची आतुरतेने वाट पाहत असते . रोज.. अशी कित्येक रात्र…
बापरे….इतका विचार , माझ्याकडनं हि झाला नंसता रे ?
कसं सुचत तुला ?
त्याने तिच्याकडे सहज पाहिलं .
तिच्या ‘स्वरात’ आपलेपणाचा गहिरा भाव त्याला दिसून येत होता.
सहज रे , दृष्टी अन सृष्टीचे हे खेळ आहेत. त्याला बस्स आपल्या मनातले भावरंग हळूच जोडायचे इतकंच…
अच्छा …
हं ..
मग काय आहे त्या दोघांत , मैत्रीतलं प्रेम कि प्रेमातली मैत्री ?
दोन्ही हि…….
कसं ?
मैत्री शिवाय प्रेम नाही. अन प्रेमाशिवाय हि मैत्री .
दोघांत हि बघ , मैलोच अंतर आहे . पण तरीही ..ते दोघे एकमेकांशी हे प्रेमाचं नातं टिकून आहे .
आजही.. अद्यापही, शेकडो वर्ष …
मनातलं हे (एकमेकांचं ) ‘प्रतिबिंब’ जपता आलं पाहिजे रे …आयुष्यभर..!
तिने त्याकडे एकवार पाहिलं. कुठल्याश्या गर्द विचारी प्रवाहात तो हरवून गेला होता.
तिने हि त्याच्या बाहुपाशात स्वःताला विसावून घेतलं होतं .
– संकेत य पाटेकर