पेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा

जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं.

 

माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे… 

तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. म्हणूनच त्यावेळेसच्या आठवणी ही पुन्हा एकदा जागत्या आल्या.पण त्यावेळेस सारखा तो निवांतपण अनुभवता आला नाही. 

पेठ ला …जत्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं. 

सह्याद्रीच्या भेटीला हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. निव्वळ आणि निव्वळ मौज आणि मस्तीसाठी.

खरं तर कलावंतीण, लोहगड विसापूर, सिंहगड, पेब , पेठ.. ह्यासारखी ठिकाणं , ही आपली स्वराज्याची बेलाग बुलंद ठाणी (भावबंद गर्दीने सध्या घुसमटत असलेली… )ह्याचा इतिहास भूगोल, निसर्ग नि जनजीवन…हे निवांतपणे.. 

आठवड्यातल्या मधल्या कुठल्याश्या वारी…

कधी भेट देऊन अभ्यासवेत वा कुतूहलाने स्वराज्य नजरेनं ते एकाकी पाहून घ्यावेत.

( तुम्ही जर खरंच सहयाद्री वेडे असाल, स्वराज्याच्या ह्या वास्तूंशीशी एक निष्ठेने असाल तर आणि तरच …उगाच कल्ला नि गोंगाटा करण्यास इथवर येण्याचे कष्ट घेऊ नयेत. )

इतर वेळेस सर्वच ठिकाणी इथे जत्रेच स्वरूप आलेलं असतं.
हौसे नौशे सगळीच उधाणलेली असतात.

निव्वळ मौजमस्ती साठी.त्यांना इतिहासचं कौतुक नसतं. भूगोलाशी सख्य नसतं.
निसर्गातल्या कलात्मक बाबींची नि इथल्या लहान सहान घटकातल्या सौन्दर्याचा आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल रुची नसते. तशी दृष्टी नसते. आणि महत्वाचं म्हणजे शिस्त… नसते.आणि म्हणूनच..
जिथे तिथे..मोठमोठ्याने सुरू असलेला कल्ला 
हिंदी गाण्याचा बाज..शिव्या व्याप…आणि ऐतिहासिक वास्तूंची सुरू असलेली ओढताण…नको ते उद्योग,ह्यांन मन अस्वस्थ होऊन जातं. 

काल परवा हे असंच काही अनुभवलं.

जत्रेत रेटारेटीत जावं. गोंगाट करावा आणि परतावं तसंच काहीसं..

सकाळी साडे आठची कर्जत हुन आंबिवली मार्गे जाणाऱ्या एसटीने,

तास सव्वा – तासाच्या प्रवासघडी नंतर, आम्ही आंबिवलीत दाखल झालो. पाय उतार होताच, नजर वर उंचावून पाहिलं. 

जागोजाग वाहनांची (ट्रॅव्हलर, बसेस, इतर ) रीघ दिसत होती. परिसर त्यानंच गर्द झाला होता. 
त्यावरूनच संख्याच गणित कळत होतं. आधीच एसटी तील भरगच्च संख्या आणि त्यात ही … ,
नजरेसमोर , एकूणच पुढचं चित्रं उभं होत गेलं.गर्दीने वेढलेला कोथळीगड मुक्याने साद घालू लागला..
”अरे कुणी तरी थांबवा हे..”त्याची ती अवस्था मनाला अस्वस्थ करून जात होती.
काय करावं…? कुणा सांगावं ? 
मन एकीकडे असं विचारांत गुंतलं असता..
हिरवाईचा हा स्पर्श आणि नटाटलेली ही जीवसृष्टी.. देहमन आनंदून नेत होती. 
वर्षाऋतूच्या सहवासात ..सृष्टीनं ही आपलं रूपडं पालटलं होतं. 
हिरवाईचा शाल पांघरूण… ही धरणीमाय आनंदाने हिंदळत होती. उत्साह त्यानंच दुणाणला होता. दुपट्टीने वाढला होता,

पण तो काहीच वेळ.. जस जसं पुढे होत गेलो. 
आणि पेठ वाडीत पोहचलो. आणि चढाईला सुरुवात केली. तेंव्हा घोळक्या घोळक्याने सुरू असलेला कल्ला नजरेत खूपु लागला.

तरुणाई होश हरपून होती. पाऊला माग पावलांचा ठसा उमटला जात होता. एकेरी दीर्घ अशी रीघ लागली होती. त्यात कोणी गात होतं. कोणी गाण्यावर ताल धरून होतं. हिंदी पंजाबी गाण्यानं तर डोकं वर खुपसलं होतं. सृष्टीतल्या स्वरील सुरावटीचा गुंजनांद त्यानं लुप्त होत होता.
कुठेशी शिव्यांची भाषा सुरू होती. 

नको ते शब्द मुलींदेखत वटले जात होते. तीन चार जणांच्या त्या घोळक्यात ती मुलगी ही बिनधास्त मिसळून होती. नवल ह्याचच होतं.
अवघ्या काही वेळातच उंच सखल पाय वाटेतून, निसरड्या वाटेतून, बेचकीतून..बुरुजाजवळ येऊन पोहचलो. 
तेंव्हा समोरच्या दृश्यानं देहमनाचा राग अजून उफाळला गेला.

कधी काळी शत्रूवर नजर रोखून असलेली , काळीज धस्स करणारी तोफ, त्यावर दोघीजणी निवांत बसून गप्पा मारत…होत्या. त्याचं त्यांना काहीच वाटत न्हवतं.
मान अभिमान नावाची गोष्टच शिल्लक न्हवती.
” इतिहास ठाऊक नाही, पण निदान अपमान तर करू नका रे..” 
आमच्या पैकी ‘रोहन अन मी ‘ दोघे पुढे होऊन दोघींना फटकारलं, तेंव्हा ‘सॉरी’ म्हणत त्या माघारी फिरल्या..

आता इथून आणि ह्या पुढे काय काय पाहावं लागेल. ह्यांने धास्तीच भरली होती…
किल्ले भटकंतीला जत्रेचं स्वरूप आलं होतं.
त्यात श्वास कोंडला जात होता, तो ह्या बेलाग बुलंद सह्याद्रीचा…
स्वराज्यातील देदीप्यमान ह्या तोरण माळेचा..
वीरमरण पत्करलेल्या त्या शूरवीर नरवीरांचा..
त्या असंख्य मावळ्यांचा…अन माझ्या सारख्या एका सह्य वेड्या भटक्याचा ही…
यावे ….आणि अवघे यावे , पण ती शिवदृष्टी घेऊन…
स्वराज्य ध्वज होऊन…मावळा होऊन..,
हा बलदंड राकट सहयाद्री आणि इथला रम्य हसरा निसर्ग आणि माणूस ह्यातील दुवा साधत, स्वतःला त्यात सामावून घेत….

जय शिवराय।।।

©संकेत पाटेकर..

पेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा

इतिहास आणि भौगालिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर जा : 

http://trekshitiz.com/marathi/Peth_(Kothaligad)-Trek-P-Alpha.html

GoPro Hero 7 Black with Shorty, SD Card and Rechargeable Battery

Leave a Comment

Your email address will not be published.