पत्ररूपी संवाद …

पत्ररूपी संवाद …
प्रिय आई …
साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा , बऱ्याच  दिवसाने … तुला पत्र लिहावयास घेतोय . रागावू नको हं ..!
तशी तू रागावणार  नाहीस  हे मला माहित आहे.!
कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही , नाही रागवत , राग असला तरी तो क्षणभराचाच , तो हि समजाविण्या अन घडविण्या  हेतूने… हो नां  ?
मी तर तुझाच बछडा …  तुझ्याच ममत्वेने उंचावलेली…तुझीच घडीव मूर्ती  ..   
मी जे काही  आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे…तुझ्या शिकवणीमुळे , तुझ्या संस्कारामुळे..आई !
पण आज एकट वाटतंय … तुझी उणीव अधिकतेने जाणवतेय ,  गहिवरून येतंय ,
का ? ते विचारू नको …मला सांगता येणार नाही…
सावली होवून तू  नित्य नेहमी,  तशी सोबतच असतेस म्हणा , …पण तरीही आज राहवलं नाही. म्हणून हि लेखणी हाती घेतली .  
आई ..
अगं..! वयाने कितीही मोठो झालो ना,  तरी आईसाठी तिचं  छोटंसं तान्हुलं बाळचं असतो आपण , न्हाई ?
अन म्हणूनच बघ ,   मोठे झालो तरी हि आईच्या  मायेभरल्या पंखाखाली,
तिच्या कुशीत,  क्षणभरासाठी का असेना  , कधी निवांततेत  अलगद पडून राहतो. वात्सल्याची सुख चैनी  उब घेत .
तेंव्हा ना कसली  चिंता असते,  ना कसले दु:ख …. ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले …स्थिर असे…, लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना…?
पण ऐक ना आई ,  कित्येक दिवस झाले बघ .., ह्या क्षणापासून मी पोरका झालोय अगं..  .
तू अशी दूर .. 
”मी कुठे हि असली तरी  तुमच्यावर  नजर ठेवून असेन.”  अस म्हणून , रागावून  कुठे निघून गेलीस ती पुन्हा  परतून न येण्यासाठी…
पण कधीतरी तुला,  तुझ्या ह्या पिल्लांना कवेत घेउसं वाटत  असेलचं   ना ? डोळे भरभरून पहायचं असेलच ना ? 
सांग…येशील   परत….., तुझ्या पिल्लांसाठी ?
  
तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..!  
कष्टाने झिजलेल्या  तुझ्या  नाजूक कोमल हाताचा , मायेभरला स्पर्श
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू…
ते क्षण आठवले कि आजही  ममत्वेने  भरलेला तो तुझा हात ,  अलगद केसातून भिरभिरत  राहतो .
किती सौख्य आहे अगं , त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?
‘मायेचा स्पर्श’ सगळे क्षण कसे हलके फुलके बनवितात , न्हाई  ? 
वेदना दुखांना  तिथे अजिबात  थारा नाही. एखादी भळभळती जखम सुद्धा ‘आनंदाचे गायन’ करत चिडीचूप होईल इतकं अफाट  सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या  मायेभरल्या स्पर्शात असतं .
 ह्या ‘प्रेमाची’ उत्पत्ती’ च मुळात ‘आई’ ह्या रुपानं’च झालेय,  असंच  जणू  .  अन आहेच . 
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं सर्वत्र भिनभिनू  लागलं ..,  मग ती हि ‘पृथ्वी’ रुपी आई का असो ,  ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई…!
ह्या माय भूमीसाठी , ह्या राष्ट्र रक्षणासाठी , देशाच्या सीमारेषेवर, दिवस रात्र शत्रूशी झुंजणारी ,  त्यांना जागीच थोपवून देणारी हि शूरवीर लेकरं, ह्यांच्या रगा रगात , उरा उरात तेजोवलय प्रवाहित करणारी हि मातृभूमी. आईचंच रूप .   
तिच्याच प्रेम ओढीने , तिच्या रक्षणार्थ धावत आपल्या प्राणाची आहुती हसत हसत देणारी  तिची हि शूरवीर लेकरं.
माय लेकरांच,  किती हे अफाट प्रेम ना..! ह्याला तोड नाही.
आई हि आईच  !
माधव ज्युलिअन  ह्यांनी तर लिहूनच ठेवलंय .
‘प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई”
फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.
खरच गं !
आईचं  हे नातंच  अस आहे,  श्रेष्ठत्वाचं  . त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठं नाही.
बघ ,  अन  मी हे कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  ‘आई’ शीच      
‘आई’ ची महती कथन करतोय .
वेडा खुळा  आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा …तुझ्या ह्या लेकरूसाठी… मी वाट पाहतोय .
तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं  भाग्यं .., अन हे  भाग्यं मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई…! 
खूप खूप ….खूप सारं प्रेमं  ..!
एक चारोळी मुखी येतंय ..म्हणू…
म्हणतोच..!
तुझाचं तान्हुला अगं 
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
जरा पोरकपणं वाटतयं ! 
ये लवकर …आई..! 
ये लवकर ….
तुझाच लाडका
-संकु 
– संकेत य पाटेकर
१४.०८.२०१५ 

0 thoughts on “पत्ररूपी संवाद …”

Leave a Comment

Your email address will not be published.