”तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत….मार्गसानिला तिथून साखरमार्गे तुम्हाला जवळ पडलं असतं.
आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..”एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने , आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ‘ असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं.
गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू लागली. गावोगावाला जणू एक सांगावा धाडत .
”कुणीतरी आलंय हं …कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं माणूस ”
गावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी हि एसटी …मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे. असो, दिवस एव्हाना वर येऊन स्थिरावला होता . क्षितीज नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.
स्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस पोचली होती. राजमार्ग खुणावू लागलेला, रस्ते , झाडी मी माणसं , घरे, दारे , वास्तू , सरसर मागे पडत होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच जणू धावत होती .
हळू-हळुवार दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात येऊ लागली. आणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला.
” राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता मस्तकी मिरणवणार” ..अहा…, काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली.
सलग दोन वेळा… हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या चोर दरवाजातून सर केला होता . ह्यावेळेस तसं न्हवतं. होळीचा मुहूर्त साधत ..’राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ’ असा दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .
”तुम्ही, मागच उतरायला हवं व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले. शेजारी बसल्यापासून त्यांचं …तेच सांगणं सुरु होतं . राजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा……ते जवळ पडेल. पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..,मार्गसनी मागे सरलं पण आम्ही उतरलो नाही.
मूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत झाले. ”मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, ‘आता वाजेघर मार्गे जायचे आहे” पायवाटेलाच येणाऱ्या एकेका गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची, सांगड घालत मी त्यांच्यापुढे बोलता झालो. त्यावर, तुम्ही इथलेच वाटताय ‘ असा शेरा उमटवला. हा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या …
बोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही एसटीतून खाली उतरलो. गुगल ज्ञान भंडारातून आणि पुस्तकीय दाखल्यातून हवी असलेली माहिती मिळवलीच होती. बस्स , आता चढाई आणि पायपीट चा श्री गणेश करायचा होता.
तत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून, कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,
ये ते बघ , त्या काकांना विचार ?
आमच्यातल्याच कुणी एकाने …रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.
काका , राजगड साठी कुठून वाट आहे? त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक किलोमीटर पुढे , मूळ मार्ग सोडून ,
आता पुन्हा माघारी …. , चला इथूनच सुरवात ट्रेकला : मनाशीच म्हटलं . काकांनी शेता बांधावरून जाण्याचा योग्य तो सल्ला दिला. पुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल. काकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता इथून पुढे किती वेळ चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता.
क्रमश :
संकेत पाटेकर
५/५२०१८