‘घाटवाटा’ म्हणजे सुखद अनुभव.. सृष्टी आणि सह्याद्रीतलं आगळ वेगळं चैतन्यं – संकेत

‘पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड’

पन्हाळा पावनखिंड करताना..त्या एकूण मधल्या पट्ट्यात आम्हाला अनेक गावांचा अगदी जवळून संबंध घेता आला. साधंसच जीवनमान जगणारी पण हिरव्याशार निसर्गाच्या गर्भ श्रीमंतीत वाढलेली हि खेड्यापाड्यातील दिलखुलास मोकळी माणसं. आपुलकीचा झुळझुळ झरा मनभर साठवूनच असतात. आपलेपणच्या आपल्या नुसत्या एका शब्दानं हि माणसं स्वतःहून स्वतःला मोकळं करत ,छान सुसांवाद साधतात. तेंव्हा आपण कुठे दूर नाही, तर आपल्याच घरात..आपल्या माणसात वावरत आहोत अशी जाणीव आल्याशिवाय राहत नाही . अशी माणसं जागो जागी आम्हाला भेटत गेली.

गर्द वनातील त्रिकुट : महिपतगड_सुमारगड आणि रसाळगड

चहूकडनं किर्रsss जंगलांनी वेढलेला आणि वन्य प्राण्यांची चाहूल असलेला हा महिपतगड (आसपासचा संपूर्ण परिसर ) अन त्यात राहण्याजोग एकमेव पण उत्तम अन प्रशस्त ठिकाण म्हणजे पारेश्वर मंदिर. आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. एवढ्या जंगलात आम्हा चार मित्रांची मित्रावळ ( मी, यतिन, अनुराग अन आमचं प्रेमळ कार्ट कला 😉 अन ती जागृत अवस्थेतील अनुभवलेली रात्र …केवळ अविस्मरणीय.) बिबट्याचा अन इतर वन्य प्राण्यांचा वावर ..म्हणून आधीच बाळगलेली सावधगिरी. रात्रीच एकट्याने बाहेर पडायचं नाही. हाती काठी असलीच पाहिजे..वगैरे वगैरे ..

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

अडीस तासाच्या पहाटी प्रवासा नंतर आम्ही ताहाराबाद गाठले. अन पुन्हा चहाच घोट घेत, वाघांबे साठी चौकशी केली. तेंव्हा कळलं कि आठची एसटी आहे. तसे आठ वाजण्यास अजून पाच एक मिनिटे शिल्लक होती. तोच नजर इकडे तिकडे फिरू लागली तेंव्हा एक ग्रुप तिथे नुकताच पधारलेला दिसला, तोही साल्हेरलाच ..प्रस्थान करण्यासाठी, त्यांच्याशी थोडी ओळख परेड झाली आणि वाघांबे साठी दोन्ही जणांचा ग्रुप मिळून एक जिपडं ठरवून आम्ही साल्हेर वाटे निघालो. तर अश्या लष्कारी दृष्ट्या महत्वाच्या अन पावन तपोभूमीत आमचा शिरकाव झाला. आणिआठवणीत गर्क होवून गेलो. घोड्यांच्या टापांचा आवाज, मातीचा विजयी गंधयुक्त धुरळा डोळ्यासमोर पसरू लागला. येथूनच कुठे ते दौडले असतील, इथेच उरल्या सुरल्या मुघलां नि मराठ्यांपुढे गुढघे टेकले असतील. शरणागती पत्करली असेल. इकडेच कुठे लढाई दरम्यान रणशिंग फुंकले गेले असतील, त्याचा आवाज अजूनही निनादतोय बघा..! हाच तो भूप्रदेश... हि ती माती..भाळी टीळावी अशी …

सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव

बराच वेळ निघून गेला. आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती. सिद्धगड अजूनही डोकं वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्रssssकिर्र अन पावलांचा चालण्याचा आवाज आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी. हळू हळू पुढे कुणास ठाऊक …मला भास होऊ लागला कि माझ्या मागून कुणीतरी येत आहे. चर्रचर्र असा आवाज येऊ लागला. मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवतं. कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे असं सतत भासत होतं. मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागलं होतं. मला भास होत होता कि कुणी होतं तिथे माहित नाही. संरक्षणासाठी तसं प्रत्येकाकडे हत्यार होतंच. ते बाहेरच काढूनच ठेवलं होतं. कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल. आम्ही होतो तेही चौघेच. दोन मुलं आणि दोघी मुली.

रवळ्या जवळ्या – मार्कंड्या

नाशिक हे माझं सर्वात आवडतं ठिकाण , ते त्याच्या उंचच उंच अश्या कातळकोरीव रौद्र भीषण पण तितक्याच सौन्दर्यपूर्ण अश्या सह्य कड्यांमुळे, ऐतिहासिक तसेच पावित्र्य अश्या अध्यात्मिक महतीमुळे.. गेले दोन दिवस अश्या ह्या आपल्या सह्य मंदिरात आम्ही मुक्काम धरून होतो. रवळ्या जवळ्या पठारावरील लुकलुकणाऱ्या असंख्य तारका समूहा सोबत , त्या नभो मंडळात , गूढ अश्या शांत वलयात अनुभवलेली/ मंतरलेली ती रात्र , कदापि विसरता येणार नाही. तारका समूहांच ते पांघरून अंगावर घेऊन निजनं किंव्हा नजर उघडी ठेवत नक्षत्रांच ते देणं अनुभवणं ह्यासारखं सुख नाही. भर दिवसा अन सांज समयी , रवळ्या जवळ्या वरील गूढ वलय, तो सौम्य(आनंद देणारं) थरार , त्या वास्तू अन एकूण रम्य असा सभोवताल… मन अगदी प्रसन्नतेत खळखळत होतं.

सह्याद्रीतल्या रानोमाळ अश्या भटकंतीसाठी उत्तम असे शूज..
सह्याद्रीत भटकताय ..मग हि पुस्तकं संग्रहित असावी.
राजगड – शोध सह्याद्रीतून..
आमची रायगड वारी..
मल्हारगड ..

पुढील लेख लवकरच अपडेट करेन :
1. घनगड – तैलबैला – वाघजाई आणि ठाणाळे
2. लोणावळा भीमाशंकर आणि शिडीची वाट
3. रतनगड ते हरिश्चंद्रगड

Leave a Reply

Your email address will not be published.