ग्रेट भेट : साहित्यिक अन कवी सूर्यकांत मालुसरे

” कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा…. ”
काल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. ‘माई’
कधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही.

बंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं.
क्षणभर वाटलं त्वरित त्यांच्या जवळ जावं अन त्यांना खेटून बसावं . त्यांच्या वात्सल्यरुपी पंख छायेत. पण नाही. तसं करता आलं नाही . कारण पहिल्यांदाच आज त्यांना भेटत होतो. पहिल्यांदाच त्यांच्या ह्या साहित्यरूपी सदनात प्रवेश दाखल झालो होतो.
म्हणूनच थोडं आवरलं स्वतःला…… भावनेचं हे उथळतं हृदय सांभाळून घेत .म्हटलं बोलावं आधी आपण मनमोकळंपणानं ..
तर असो,
थोर असे साहित्यिक कवी सूर्यकांत मालुसरे , ज्यांच्या नावातच (मालुसरे) कर्तृत्वाचा शिखर उंचवलं गेलंय असे दिग्गज कवी , त्यांच्या घरी आज भेटी गाठीचा योग जुळून आला होता.
कवी -लेखक आणि एक डोळस भटकंती करणारा, आमचा भटक्या मित्र चंदन ह्यांसोबत ,
प्रभादेवीच्या त्यांच्या त्या राहत्या घरात….

एखाद दीड तासाची अवघी ती भेट , पण त्यात हि त्यांचे साहित्यविश्व , त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी भूषवलेली अध्यक्षपद , त्यांनी लिहलेली काव्यसंग्रह ..आणि अनुभवाची गतमोकळी शिदोरी त्यांनी त्यात आम्हांपुढं उघड केली.
सोबतीला चहा बिस्किटांचा गोड मधाळ असा पाहुणचार हा होताच.
त्यासोबत एकीकडे माईंचं बोलणं देखील , मनावर अधोरेखित होत होतं. इतिहासावरचा त्यांचा अभ्यास आणि विचारांची सशक्त शैली त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
काका , माई मी आणि चंदन हि चौकट आज विचारांत मिसळली होती.
एकंदरीत भूत वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मिलाफ… आम्हा बोलण्यातून एकत्रित असा उकळत होता. ”तुम्ही इतरांपेक्षा जरा वेगळेच आहात हा” ..निघता निघता …निरोप घेता घेता हा शेरा माईंनी देऊ केला.
‘शिवगाथा’ हि प्रत काकांनी आमच्या कडे सुपूर्त केली. एक भेट म्हणून ….
ह्यातील एक एक कविता म्हणजे जणू प्रेरित भव- सागर, न्हाहून उसळून निघावं असं.
सहज- सरळ आणि सोप्या अश्या भाषेतलं . सहज गुणगुणायला लावणारं. ओठी स्थिरावणारं …
वयाच्या ८७ तही काकांचा लिखाण काम सुरु आहे . आणि लवकरच त्यांचा एक काव्यसंग्रही हि येतोय . त्याचीच आतुरता आहे.
निघता निघता मनातली इच्छा हि पुरी करून घेतली.
माईंसोबतचा एकत्रित असा फोटो …
– संकेत पाटेकर
१३/०३/२०१८

Leave a Comment

Your email address will not be published.