क्षण..

क्षण..

संध्याकाळची वेळ.  ऑफिस मधून निघाल्यावर ..लोकलमधल्या त्या घामाजल्या  गर्दीचे धक्के पचवत मी ठाण्यात उतरलो.  कुठल्याश्या जाणिवेने आणि व्याकुळतेने आज  मनाची स्थिरता तशी  ढळली होती. 
अस्वस्थता दाटून आली होती देहभर , मनभर संचार करून आणि म्हणूनच थेट घरी जाण्यास हि हे मन आज  मज्जाव करत होतं . त्यालाच  थोडी मोकळीक आणि आपुलकीची  थाप द्यावी  म्हणून मी मुद्दाम तलाव पाळीच्या दिशेनं एकटक 
चालत सुटलो. माणसाच्या स्वभावशैलीच्या रंगीत तालमीतून स्वतःच्या मनाची दखल स्वतः घेत , मी पोचलो त्या ठिकाणी. 
नजरेच्या एका  कोपऱ्यातून ,  मनाच्या एकांता करीत  योग्य   मोकळी  जागा हेरत,  मी एका ठिकाणी    आसनस्थ झालो .विचारांचं प्रहर पुन्हा  सुरु झालं . थांबलंच कुठे होतं म्हणा ते,  पण आता नव्या विचारांची ये जा सुरु झाली. त्यात पुरता गढून गेलो . स्वतःला उसवत,  हळुवार उलगडत गेलो . 
त्या विचारातून  स्वतःच शोध घेत असता….
‘काका’ अशी हळुवार हाक ऐकू आली. क्षणभर हसलो मी त्या शब्दांनी स्वतःशीच   …आणि नजरेपुढे आलेल्या त्या कागदाकडे कुतूहलाने पाहत राहिलो . म्हटलं काय आहे हे?  मनाशी उलगडून पाहत होतो . तेव्हड्यात शब्द पुन्हा कानी आले. 
काका, उद्या नाटक आहे गडकरी ला ?  हे दाखवल्यावर तुम्हाला तिकिटावर सूट मिळेल .  
सुरवातीला वाटलं कसलीशी पावती  दाखवून हा  पॆसे वा वर्गणी  गोळा करत असणार , पण नाही 
 त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली. 
हल्ली ना  सेक्स ह्या विषयाला धरून बरेच अढी तढी निर्माण झाल्यात समाजात  , गैरसमज आहेत. 
त्या विषयाला धरून हे नाटक आहे . जरूर पहा . 
मगासपासून मी त्याचा चेहऱ्याकडे लक्ष दिलं न्हवतं. हाती असलेल्या त्या कागदाकडे शून्य नजरेने एकटक पाहत होतो.  
मात्र त्याच्या ह्या सेक्स विषयी , असे  परखड दोन एक शब्द कानी पडल्यावर  आपसूक त्याकडे लक्ष गेलं.  मान उंचावली गेली. 
सहावी सातवीतला तो विद्यार्थी असावा,  हाफ पॅन्ट आणि इन केलेला शर्ट,  गोलाकार चेहरा आणि चेहऱयावर खिळलेले नितळ  हास्यभाव , सोबत इतर कुणी न्हवतं.
तरीही बेधकडं असं त्याच बोलणं आणि हे सांगणं हेच  मला   कमाल वाटली.  
उघडपणे सेक्स हा विषय तसा  कुणापुढे मांडणं बोलणं हेच खरतरं धाडसाचं , कारण आपल्या समाजमनात त्याविषयी काही बोलणं म्हणजे भलतं सलतं मनात येऊ घालतं. आणि ते काहीसं पापच असं  ठरतं.  
खरं तर ह्या गोष्टीच शिक्षण वेळेत देणं गरजेचं आहे ,  
बलात्काराच्या वाढलेल्या एकूण घटना , वाढत चाललेली स्त्री विषयक वासनांतक  भोग दृष्टी …हि  मनाची विकृति आणि त्याला बळी ठरलेल्या निरपराध नाज़कू कोवळ्या  मुली, स्त्री… हे सगळं कुठेशी थांबायला हवं. रोखायला हवं . 
आणि त्यासाठी शिक्षण आणि कायद्याचा धाक, ह्या दोन्ही गोष्टींची  कडक अंमलबजावणी आपल्या समाजमनात लागू केली पाहिजे. 
स्त्रीचा आदर , मान सन्मान असेल तर  ह्या देशाची प्रगती आहे . भारत हि मातृभूमी जशी मानतो. तिच्यापुढे जसं आदराने पाहतो. नवरात्रीला देवीला जशी पुजतो . तसं  इथल्या स्त्री  मनाचा हि आदर झाला पाहिजे. नाही नाही ,  तो केलाच पाहिजे. समाज मनाला लागलेल्या ह्या वासनात्मक किडीचा मुळासकट नायनाट करून….
काही क्षण असाच  विचारधुन्द झालो होतो. चेहऱ्यापुढे गोडशी स्माईल देऊन तो मुलगा केंव्हाच निघून गेला होता . आणि मी पुन्हा आपल्या दुनियेत ..

क्षण..

– संकेत पाटेकर 

Leave a Comment

Your email address will not be published.