कोरीगड – कोराईगड – korigad

 

मागील रविवारी वसई किल्ल्याला भेट देऊन आलो होतो आणि त्या अगोदरच माझं ठरलं होतं.
पुढच्या रविवारी कोरीगड सर करायचं. त्याप्रमाणे मी कोरीगडाची माहिती गोळा केली होती. कसं जायचं, कोणती एसटी पकडायची, कोणत्या मार्गाने जायचं, ह्याची माहिती मित्रांकडून तसेच नेट वरून हि घेतली होती.

ट्रेकच्या आदल्या दिवशी सर्व मित्रांना मी कळवलं होतं. कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं ते , माझा एक जुन्या ऑफिसचा मित्र देखील येणार होता आणि तो पहिल्यांदा येणार होता, आमच्या सोबत ट्रेकला आणि त्याचा हा पहिलाच ट्रेक. ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी पाच मित्र एकत्र आलो होतो. एक अजून आला न्हवता, सकाळच्या ६:१५ ची इंद्रायणी मेलने आम्ही जाणार होतो. ६;२० मिनटे झाली तरी एक मित्र अजून आला न्हवता. कॉल सुद्धा तो उचलत न्हवता. शेवटी तो मित्र आलाच नाही. ६:१५ ची ती ट्रेन १०-१५ मिनिटे उशिराने आली. गर्दीही होतीच. कसा बसा चढलो ट्रेन मध्ये. ट्रेन च्या डब्यापेक्षा माणसाची संख्या जास्त असल्याने उभं राहूनच प्रवास करावा लागला आणि नेहमीच लागतो.

सकाळी ८:१० मिनटाने आम्ही लोणावळा स्थानका वर उतरलो. तिथून पुढे सरळ आम्ही १०-१५ मिनटात लोणावळा एसटी डेपोत पोहोचलो. मी माहिती मिळवल्याप्रमाणे सकाळी ९:१५ ची पेठ शहापूर मार्गे जाणारी भांबुर्डे हि पहिली एसटी होती. पण चौकशी केली तेंव्हा मास्तराने सांगितले ” ती काय समोर उभी भांबुर्डे – पेठ शहापूर मार्गे जाणारी एसटी.
आमच्या पैकी कुणीच जेवणाचे डबे आणले न्हवते आणि भूख हि लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी वडा- पाव घेतले गडावर जावून खाण्यासाठी आणि एक एक वडा पाव तिथेच फस्त केला. आणि स्थानकात उभ्या असलेल्या भांबुर्डे एसटी मध्ये जाऊन बसलो.

बरोबर ८.३५ ला भांबुर्डे एसटी सुटली डेपोतून. ९५ रुपये तिकिटाचे झाले. एकाचे आंबीवने गावापर्यंत १९ रुपये तिकीट. सकाळचं छान असं वातावरण त्यात धुकं , गार गार हवा चुहू बाजूंची हिरवळ , वळणा वळणाचे खड्डे बिलकुल नसणारे, सुंदर पट्ट्या पट्ट्यांचे डांबरी रस्ते, ह्यांने मन मोहून गेले होते. प्रसन्न झाले होते. ८;३५ ला डेपोतून सुटलेली आमची एसटी पेठ शहापूर ला ठीक ९:१० वाजता पोहोचली. एसटी तून उतरत असतांनाच समोरच कोरीगडच सुंदररूप नजरेस पडलं. एसटी तून उतरलो तेंव्हा त्याच एसटी मध्ये एक असाच किल्ल्यांची आवड असणारा, इतिहासाची माहिती असलेला आणि कोरीगडला एकटाच आलेल्या त्या माणसाची ओळख झाली. दिनेश कदम त्यांच नाव. पुढे त्यांनी त्यांचा DG CAM आमच्याच हाती सोपावला. फोटो काढण्याकरिता.

वाट चुकू नये म्हणून रस्त्या पलीकडल्या त्या एका दुकानातल्या मुलीला आम्ही विचारलं गडावर जाणारा मार्ग ” तिने सांगितल पुढे एक लाल अशी मळलेली छोटी पायवाट आहे . तिथून जायचं.
एसटी थांब्याहून पुढे १ मिनिटावर डाव्या बाजूला मळलेली पायवाट आहे. तिथून गडावर जाणारा मार्ग आहे. तिथून साधारण पाऊन तास लागतो. गडाच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यास.

पावसाळ्याचे दिवस असल्याने ती वाट घसरणीची झाली होती. तिथून आम्ही थोड्याच वेळात म्हणजे २० मिनिटात पाय्र्याशी येऊन पोहोचलो. पायऱ्या पासून गडाच्या दरवाजा पर्यंत जाण्यास पुन्हा २० मिनिटे लागतात. तिथून साऱ्या निसर्गाची उधळण आपल्या नजरेस पडते. खाली आंबे व्हॅलीचं सुंदर दृश्य दिसतं. समोरच तिकोना खुणावतो. गडावरील तिळाची फुलं मन वेधून घेतात. मन रहावत नाही त्यांच्या सोबत एखाद फोटो काढल्याशिवाय.

गडाच वैशिष्ट म्हणजे तटबंदी वरून संपूर्ण गड फिरता येतो. गडावरील तोफा आपलं लक्ष वेधून घेतात.

 

तटबंदी वरून चालत चालत पुढे बुरुज,चिलखती बुरुज,चोरवाटा पाहून आम्ही लक्ष्मी तोफे जवळ आलो. लक्ष्मी तोफे जवळ शिव गर्जनेने आम्ही सारा आसमंत दणाणून सोडला. पुढे कोराई देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या चौथर्या पाशी थोडी विश्रांती घेतली. गडावर माकडं सुद्धा बरीच आहेत. आपल्याजवळ एखाद काही खाद्य वगैरे दिसलं कि ते आपला पिच्छा सोडत नाही. मागे मागे धावतात. थोड्या वेळेच्या विश्रांती नंतर आम्ही पुन्हा गड पाहण्यास सुरवात केली. गडावर दोन मोठी तलाव आहेत. गड चढण्यास खूपच सोप असल्याने इथे पर्यटक येताच राहतात. मौज मजा करण्यासाठी. मोठ मोठ्या किंकाळ्या मारण्यासाठी. इतिहासाच त्यांना काही घेणं – देणं नसतं. आपलं मन मुराद मस्ती करायची आणि निघून जायचं बस तितकंच.

गड पाहून झाल्यावर थोड पोट पूजा करून झाल्यावर आम्ही आंबीवने मार्गे गड उतरण्यास सुरवात करणार होतो. गडावर दोन वाटा असल्यास एकीकडून सुरवात करावी चढण्यास आणि दुसऱ्या वाटेने उतरावे. म्हणजे कसं संपूर्ण गड पाहल्यासारखं होतं आणि दोन्ही वाटा माहित होतात. असं मी पुस्तकात वाचलं होतं आणि आमच्या ( मिलिंद चाळके ) सरांनी देखील गोरखगडाच्या ट्रेक दरम्यान सांगितल होतं.
नव्या लोकांसाठी आंबीवने मार्गी वाट थोडी अवघड आहे. आम्ही त्या दिशेने उतरण्यास सुरवात केली खरी . पण पुढे दहा पंधरा मिनिटानंतर पुढची वाटच दिसेनासी झाली. खाली नुसता सरळ उभा कडा दिसत होता. पावसामुळे गवत- झाडी वगैरे सुद्धा वाढली होती. त्यामुळे पुन्हा आम्ही आलो त्याच वाटेने म्हणजे पेठ शहापूर मार्गी उतरण्यास सुरवात केली.

आम्ही सकाळी १०:०० वाजता गडाच्या मुख्य राजमार्ग असलेल्या दरवाजापाशी पोहोचलो. आणि गड फिरून वगैरे पुन्हा तिथेच दुपारी १२:४५ ला आलो आणि गड उतरण्यास सुरवात केली. चोहीबाजूंनी हिरवाईने, डोंगर-दर्यांनी, सुंदर फुलांनी नटलेला हा गड पाहताना खरंच मन हरवून जातं. एका दिवसात हा ट्रेक करता येतो. पेठ शहापूर गावात हॉटेल सुद्धा आहे. त्यामुळे गड वगैरे फिरून झाल्यावर आपली इथे भोजनाची व्यवस्था होऊ शकते. घरूनच डबा आणल तर उत्तमच.

संकेत य .पाटेकर
२४.०९.२०११
ठाणे ते लोणावळा – इंद्रायणी ( सकाळी ६:१५ मिनिट ) तिकीट दर : ४१ रुपये लोणावळा डेपोतून : लोणावळा ते भांबुर्डे (पेठ -शहापूर मार्गे ) तिकीट दर १९ रुपये (सकाळी ८:३० ची पहिली एसटी )

 

Leave a Comment

Your email address will not be published.