कुलाबा – सर्जेकोट अन भरतीची लाट
माणसाने कितीही प्रगती केली, तरी त्याला ह्या निसर्गापुढे मान झुकवावी लागतेच. हतबल व्हावेच लागते. दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे, त्याच्या त्या भव्य-दिव्य शक्तीपुढे. ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला. पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो.
पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून ..

सकाळच्या तांबड्या – सोनेरी कोवळ्या उन्हातून..त्या तरंगातून..सागरी फेसाळ लाटातून..
मांडावा बंदरात अन तिथून त्यांच्याच बसने पाऊन तासात रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नारळी पोफळीच्या बागेतून थेट अलिबाग, मनात त्या बळकट अन ऐतिहासिक किल्ल्याचे ते रूप साठवून..
छत्रपती शिवराय,छ त्रपती संभाजी महाराज, मराठी आरमार प्रमुख ..दर्यासारंग ..कान्होजी आंग्रे ..ह्यांच्यासारखे आदर्श व्यक्ती आणि त्याचे ते महान कार्य डोळ्यात साठवून..

आम्ही अलिबाग एसटी स्थानका जवळ आलो अन तिथून १०- १५ मिनटे पायी चालण्या नंन्तर अलिबागच्या त्या समुद्र किनारी येऊन थांबलो .
आमच्या पैकी दोघेजण निलेश अन स्नेहल ह्यांनी सकाळी आठ वाजताच बाईक ने डोंबिवली हून अलिबाग गाठले होते . २ तास ते तिथे आमची वाट पाहत कंटाळून गेले होते.

आम्ही पोहताच त्यांना हायसे वाटले असावे ह्यात शंकाच नाही ….
स्नेहल चा चेहरा तर प्रेमळ रागाने फुगला होता. थोडं बोलन अन निलेश अन स्नेहल शी थट्टा मस्करी झाल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणून मी समुद्रकिनारी नौका /होड्या कुठे दिसते का ते पाहू लागलो.

भरतीची वेळ होती त्यामुळे आम्हाला काही पायी किंव्हा टान्ग्यानी जाता येणार न्हवते.
नजर आपुसकच मग इकडे तिकडे नौकेच्या शोधार्थ समुंदर किनारी झेप घेऊ लागली . पण कुठेच काही दिसेना. ना नौका ना नौका धारक ….नाविक…

तिथल्या स्थानिक लोकांना विचारले असता त्यांनी म्हटले ”तुम्हाला ओहोटी शिवाय किल्ल्यात जाता येणार नाही ‘ दुपारपर्यंत ते पाणी निस्तरेल हळू हळू ..तेंव्हा तुम्ही पायी जावू शकता अथवा टांग्यांनी, . होड्या बंद आहेत.

त्याचं ते वाहणारे शब्द ऐकून..मनात विचारांचं चक्री वादळच फिरू लागलं. मन सैरावैरा झाले. इतक्या सारयांना इतक्या दूर वर मी जो ऐतिहासिक किल्ला पाहण्यास घेऊन आलो. ते न पाहताच पुन्हा माघारी फिरायचं, ह्या एका विचारांनीच, मन कस स्तब्ध झालं.

आता पुढे काय ??
म्हणून सगळ्याचं एकमत होणे गरजेच होत . त्यासाठी पटा पटा एकमेकांच मत जाणून घ्यायला सुरवात केली नि काही मिनिटातच मुरुड जंजिरा करायचे हा एकजुटीचा ठराव संमत झाला.
अन जराही वेळ न दवडता आलो त्या मार्गी पुन्हा फिरलो.

तसं ह्या मोहिमेला निघतेवेळी मनात ठसवुनच निघालो होतो की आपण पोहचु त्यावेळेस नक्की भरती ही असणारच, ट्रेकक्षितिज च्या कुलाबा किल्ल्याविशायी दिलेल्ल्या माहितिपत्राताही त्या खाली शेवटी त्यानी तिथि आणि वेळ लिहली आहे,
किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा
तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००


हे सर्व माहीत असता, आम्ही निघालो. कुलाबा अन सर्जेकोट पाहण्यासाठी. का तर वाटल होत की अलिबागाचा किनारा ते किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ख़ास होड्या-नौकेच्या सेवा असतील.
तसेच काही वर्षापुर्वी माझा मित्रही कुलाबा किल्ला पाहून आला होता आणि त्यावेळेस ही भरती असल्याने तो होडीनेच किल्ल्यात जावून आला होता.

म्हणून निशंक मनाने आम्ही कल्याण- ठाणे – गेट वे – मांडवा करत अलीबाग च्या ह्या किनार्या पर्यंत आलो होतो .पण इथे आपल्यावर मनात साठवलेल सगळ चित्र पालटल होत.
म्हणून वेळ हातातून निसटण्याआधी आम्ही मुरुड जंजिरा करायचे ठरवले. अन त्यासाठी एखादी चारचाकी वाहन कुठे मिलते का म्हणून रस्त्याने चालता चालता चौकशी करू लागलो .

सुरवातीला एक टमटम वाला दिसला त्याने अलीबाग – मुरुड -जंजिरा – अलीबाग चे १५०० रुपये होतील असे सांगिलते. त्याला काही कारणास्तव आम्ही नाही म्हटले अन पुन्हा दुसर्या वाहनाच्या शोधार्थ बोलत चालत निघालो.
आमच्या पैकी दोघे निलेश अन स्नेहल बाईक ने होते .
त्यांनी पुढे जावून एक तवेरा बद्दल चौकशी केली नि आम्हाला लगेच तिथून कॉल केला .

तवेरा होती त्यामुले मस्तपैकी आराम के साथ जाण्यास मिळणार होते . पण जाउन येउन १९०० रुपये होतील असे त्याने म्हटल्यावर खरच मुरुड जंजिरा करायच का ??.हां मुद्दा पुन्हा उपस्थित झाला .

कारण खर्च वाढत होता. त्यात वेळही फार कमी होता. जाउन येउन ५ ते ६ तास होणार होते.
नि आताच इथे ११:१५ झाले होते .शेवटची सायंकाली ६:१५ ची मांडवाहुन अपोलो लौंच होती . तिने आलो त्या मार्गी पुन्हा घरी परतायचे होते.मग काय पुन्हा एकदा …ठराव पास झाला. नि जे पाहण्यासाठी आलो होतो. तो कुलाबा किल्ला पाहुनच जायचे असे मनी पक्की केले. पण त्यासाठी आम्हाला दुपार पर्यंत तिथे थांबायला लागणार होते, ओहोटी पर्यंत …तेंव्हाच कुठे तिथे जाण्यास मिळणार होते.


आता घड्याल्यातळा छोटा काटा ११ वर तर मोठा काटा ६ वर स्थिरावला होता. म्हणजेच साडे अकरा वाजले होते .दुपारी दोन ते तीन पर्यंत तरी जाता येणार न्हवते. त्यामुळे मिळालेला इतका वेळ काय करायचे हां एक नवा प्रश्न उपस्थित झाला….नि त्या प्रश्नाला थोड्याच वेळात उत्तर देखिल मिळाले.

बिर्ला मंदिर – अलिबागपासून चार चाकी वाहनाने साधारण १ तासाच्या अंतरावर
रेवदंडा साळाव ही खाडी पार केली की,
डाव्या बाजूला दोन कि.मी. अंतरावर बिर्ला उद्योग समुहाने बांधलेले संगमरवरी आदित्य बिर्ला गणेश मंदिर आहे . या मंदिरात गणेश मूर्ती व्यतिरिक्त अंबामाता, शिवपार्वती, राधाकृष्ण व सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत.मंदिरात प्रवेश करतेवेळी मात्र आपल्या सोबत आणलेले मोबाईल फोन , कॅमेरा आता नेण्यास बंदी आहे.

साधारण १२:३५ मिनिटाने आम्ही मंदिराच्या प्रवेश द्वाराशी पोहोचलो . नि दर्शन वगैरे घेऊन …काही वेळ त्या शांत ठिकाणी त्या वातावरणात तसेच बसून राहिलो.
मंदिर – मनात चैतन्य निर्माण करणार , चेहर्यावर प्रसन्नता आणणार अन शांत वातावरण असणार ठिकाण. अशी माझी मंदिराविषयी व्याख्या आहे. खरच खूप छान वाटत तिथे ..त्या शांत वातावरणात.
काही वेळ आम्ही तिथे तसेच बसून होतो …

निलेश बाईक ने आला असल्यामुळे त्या प्रवासामुळे तो फारच थकला होता . त्यामुळे तो तिथेच काही वेळ शांत पडून होता . वेळेचे बंधन असल्यामुळे नि कुलाबा किल्ला पाहायचं असल्याने आम्ही तिथून काही वेळेतच निघालो .

दुपारचे १ वाजून गेल्याने पोटात कावळे सुद्धा ओरडू लागले होते. भूख लागली होती..साऱ्यांना, त्यामुळे जे काही सोबत आणले होते जेवणाचे डबे ते पटा पटा बाहेर पडू लागले .कुणी थेपले चटणी , टोमॅटो चटणी , ठेचा, अस काय काय आणल होत.
स्नेहल ने स्वतहा ने बनविलेला केक आणला होता.त्यामुळे कसं पोटभर जेवण झाल . पोट तृप्त झाल त्या जेवणाने…

जेवण उरकल्यावर थोड्या वेळेतच सगळ्यांची एकत्रित अशी एक छानशी छबी घेऊन,
आम्ही आमच्या पुढील अन महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच कुलाबा किल्ल्याच्या दिशेने निघालो.
निलेश अन स्नेहल ह्याना घरी वेळेत पोहचायचे असल्याने कुलाबा किल्ला कडे न येता ते परतीच्या मार्गी लागले.

आमच्यामुळे सकाळी २ तास त्याना थांबावे लागले . ते हि आम्हा सोबत कुलाबा किल्ला पाहण्यसाठी आले होते.
पण वेळेअभावी ते न पाहताच बिर्ला मंदिरा पर्यंत आम्हा सोबत करून तिथूनच पुन्हा माघारी फिरले.
वाईट त्याच गोष्टीच वाटत होत . त्या दोघांना तो ऐतिहासिक किल्ला पाहता आला नाही…माझ्यामुळे
भरती -ओहोटीच्या लाटांमुळे..

असो ..तर बिर्ला मंदिरं करून जेवण उरकून आम्ही उरलेले ७ जण तवेराने सुसाट निघालो .मध्येच एका वेडसर गाडीवाल्याने आमच्या तवेराला ओव्हर टेक करून …मधेच त्याच्या वाहनाचा वेग कमी अधिक करत …तर कधी रस्ताच्या उजवीकडून डावीकडे , डावीकडून उजवीकडे गाडी वळवत काही मिनिटे पुढची जाण्याची वाट अडवून धरली. त्यामुळे आमच्या ड्राइव्हर काकांचा रागाचा पारा वाढीस लागला. नि मग काय चोर – पोलिसांचा खेळ सुरु व्हावा तसा … त्याला चांगलाच धडा शिकवावा ह्या हेतूने काकांनी पाठलाग सुरु केला .

एकमार्गी रस्ता असल्याने दोन्ही दिशेने वाहनांची ये जा सुरु होती …त्यात काकांनी इतर वाहंनाना ओव्हर टेक करत त्या गाडीला धुंडाळत त्याच्या पुढे जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवण्याच्या हेतूने गाडीचा वेग वाढवला.
तसं मनात धस्स होऊ लागले … नि सगळ्यांनी ” ” जावू द्या ओ काका …राहू द्या ”कुठे मागे लागताय ” उगाच काहीतरी भलत सलत व्हायचं” अस म्हणून काकांचा राग थंड करू लागलो.

गाडीचा वेग नि काकांचा राग थोडा कमी झाल्यावर रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नारळी – पोफळींच्या बागेवर नजर खिळवत आम्ही साधारण दुपारी २:३० पर्यंत अलिबाग समुंदर(समुद्र) किनारी पोहोचलो.
अलिबाग- बिर्ला – अलिबाग …तवेराचे ८०० रुपये आम्ही काकांना देऊ केले.
नि किनार्यावरच्या त्या वाळुच्या कणा कणावर पाय रोवीत …ठसे उमटवीत …आम्ही मौज मस्तीत किल्ल्याच्या दिशेने जावू लागलो. ओहोटी असली तरी समुद्राचं पाणी थोड्याफार प्रमाणात साठलेलं असतंच . त्या

तून डुबुक डुबुक आवाज काढत आम्ही सर्जेकोट ठिकाणी येऊन पोहचलो.

कुलाबा – सर्जेकोट

 
५ बुरुजांच अन भक्कम तट बंदीचा हा छोटेखानी किल्ला आजही वयाच्या ३६१ व्या वर्षी सागराच्या प्रचंड लाटांचा तडाखा खात ,आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.

जून १६८१ साली ह्या किल्ल्याच बांधकाम संभाजी महाराजांच्या अखत्यारीत पूर्ण झाल.
छत्रपती शिवरायांनी १६८० साली कुलाबा किल्ला बांधण्यास सुरवात केली.
पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या दोन्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.

सर्जेकोट बांधण्याचे कारण..
(शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्या जवळ डोंगर(पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा‘‘. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रु बाजुच्या मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील महाराजांच्या या आज्ञेप्रमाणेच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्या जवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला.
यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू(कॉजवे) संभाजी महाराजांनी बांधला. – ट्रेकक्षितीज सौजन्याने )

सर्जेकोट पाहून झाल्यावर …आमची पाउल कुलाबा किल्ल्याच्या दिशेने त्या बांधलेल्या सेतूवरून पुढे पुढे सरू लागली.अन किनाऱ्यालगतच्या एका भव्य अन मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थबकली .
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत.

मुख्य प्रवेश द्वारातून आत शिरताच दुसऱ्या दरवाज्याचे काही अवशेषच फक्त आपल्या नजरेस पडतात . त्यातून पुढे प्रवेश केला कि ५ रुपयाच तिकीट काढल्यावर मग किल्ला पाहण्यास निघायचे .


कुलाबा किल्ल्याचा इतिहास :
(अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

वैज्ञानिक प्रयोग : दुर्ग बांधणी
शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.

किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात.

किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे.

गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.
मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्‍या आहेत.
दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्‍या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे.

दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.
किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत.

तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड “, व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.
(ट्रेकक्षितीज सौजन्याने )असा हा ऐतिहासिक किल्ला पाहून, मनात भरून..डोळ्यात साठवून..कॅमेरात बंदिस्त करून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो .

अलिबाग ते मांडवा बस ने, मांडवा ते गेट वे अपोलो लौंच ने ..रात्रीच्या त्या शांत सागरी लहरीतून ..
आठवणींचे ते क्षण पुन्हा पुन्हा आठवून …
संकेत य. पाटेकर
१०.०९.२०१२
कुलाबा – सर्जेकोट अन भरतीची लाट
 

Leave a Comment

Your email address will not be published.