कुणी शोधून देईल का ?

अगदी म्हण्याचचं तर लहानपणापासून तिची माझी गट्टी , गाढ मैत्रीची.. 

माझ्या शिवाय तिला काही अस्तित्व नाही अशी तिची काहीशी समजूत, म्हणून
मी जेथे जाईन तेथे तिची साथ असायचीच (हा अपवाद काही क्षणाचा असेल हि ) पण तिने माझी सोबत कधी सोडली नाही. अगदी शालेय जीवनापासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत ती माझी सखी सोबती राहिली .
इतकंच न्हवे तर कुणा पाहुण्यामंडळी कडे आम्ही जात असू तर ती हि माझ्या सोबत असे . 

मुळात तिचा स्वभावच अगदी शांत , म्हणजे कायम तो ठरलेलाच , त्यात फेरफार तिनं कधी केला नाही. अन करू शकत हि न्हवती. त्यामुळे घरातले हि ओळखून होते. त्यांनी हि कधी हा कि हु केली नाही . कधी काही बोलले नाहीत . उलट कौतुकच फार असायचं . पण एकदिवशी त्याला हि उकलती कळा लागली . अन तिच्याविना हे मन विरघळू लागलं
.
मुळात झालं काय तर ..
सह्याद्रीच्या वाऱ्याने तना मनात घेर केला . त्याची ओढ लागली. पाय फिरकी घेऊ लागले. सह्याद्रीतल्या कड्या कपाऱ्यातुनी निर्धास्त होवून मी भटकू लागलो. तीही तिथे असायचीच. नाही असं नाही .
पण हळूहळू ह्या सहय प्रवासात इतर मैत्रीचे धागे दोरे वाढू लागले. एक एक माणसं जोडू लागली, भेटू लागली . बोलू लागली. नात्यांची जीवमोळी अशी एक एक साखळी निर्माण झाली. आणि झालं इथेच खटकलं. 
त्यातलेच कोणीतरी उगाच डीवचलं.. थेट स्वभावावरच शब्द रोष …आणि वार …
मग काय , सारंच बिघडलं , त्या रोषाला अन उगाचच्या चटक्या बोलणीला, बळी पडून , सुर्याबिबा सारखं लालबुंद होऊन ती सटासटा निघून गेली . ती अद्यापही परतली नाही . 

तिचं अस्तित्व हे माझं अस्तिव आहे , ह्याची जाणीव मला झाली खरी… पण आता काय उपयोग . मी एकटा पडलो. वेड्या सारखा प्रत्येक क्षणाला हसत..उगाचच .
कितीश्या विनविण्या केल्या . मन जुळवणी करून पहिली . पण काही उपयोग नाही.
ती रुसली ती रुसलीच . पण अधूनमधून ती येते. बहुदा , कीव येत असावी माझी. दुसरं आणिक काय असणार ? पण येउन तशीच निघूनही जाते. अवघे काही क्षणाची साथ देऊन बस्स…
पण खरंच यार , मला तुझी गरज आहे . शांत राहायचं मला . शांत ठेवायचं स्वतःला. स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे . घडवायचं आहे . तुझ्यविना ते शक्य नाही. कारण तू माझ्या स्वभावातली एकुलती एक गुणी अशी सखी आहेस. ……माझी मनशांती .
अरे कुणी तरी बोलवा रे तिला….मला हवेयं ती ….तिची साथ हवेय . कायमस्वरूपी
.
माझ्या मूळ स्वभावातला गुणधर्म हरवलायं . कुणी शोधून देईल का ? देईल ?
मन शातंता…
असंच काहीस लिहिता लिहता…
– संकेत पाटेकर
१०.०२.२०१६

Leave a Comment

Your email address will not be published.