काल FB वर ह्या आशयाची एक पोस्ट वाचली.
तेंव्हा भूतकाळातल्या त्या गहिऱ्या संवादात मन पुन्हा हरखून गेलं.
कित्येक दिवस अन महिने ओलांडली असतील पण त्या संवादातला त्या व्यक्तीचं हे मनाला भिडलेलं हे वाक्य मनाच्या भावपटलावरून अजून काही उतरायचं नाव घेत नाही. कारण माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला खूप महत्वाच स्थान आहे. 
त्यामुळे ‘कुणीचं कुणाचं नसतं रे.. ‘ ह्या तिच्या व्यक्तिगत जीवनभूवनातून उमटलेले स्वर मात्र माझ्या मनाला घायाळ करून गेले.

असं काहीचं नसतं … ? असं त्यावेळेस मी म्हणालो होतो खरा,   पण त्या मनास कसं पटवून द्यावं, हे त्यावेळेस मला जमल नाही. अजून हि नाही..

कधी कधी मनाच्या ह्या असंख्य भाव गर्दीत मला स्वता:हालाच हा प्रश्न पडतो.
खरचं

कुणीचं कुणाचं नसतं रे ..

तेंव्हा स्वतःला सावरत सावरत माझंच मन मला उत्तर देत.

कुणीतरी आपल्यासाठी हि झुरत असतं रे ..!

जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ….
मग कुणीच कुणाचं नसतं अस कसं होईल ?
आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं इतकंच किंव्हा असूनही दुर्लक्ष करण्यासारखं आपण करत राहतो.
आपण एकटे असे नसतोच कधी, आपल्या विचारधारा नेहमीच आपल्यासोबत असतात. 

मुळात जन्म अन मृत्यू ह्या मधला काळ म्हणजे जीवन अन ह्या मधल्या काळात कितीतरी मना- मनाची नाती आपण जुळवत असतो. आपल्या कळत नकळत… तेंव्हा आपल्या प्रती हि कुणाच्या मनात आपुलकीची आपलेपणाची प्रेम भावना निर्माण झालेली असते. एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो.

पण इतकं असूनही आपल्या मनाच्या तळाशी घर केलेली काही नाती अन त्यांच्यावरच व्यक्तिगत असलेलं अतोनात निर्मळ प्रेम आपल्याला इतर मनाच्या आत डोकाविण्याची संधीच देत नाही.
मग अशा प्रश्नाला कधीतरी आपण वर उचलून घेतो,  का ?
तर आपलं अस्तित्वं आणि त्याचं कुणालाच काही न वाटणं.  ज्यांच्या प्रती आपल्या मनात भरभरून प्रेम आहे अन आपलेपणा आहे. 

मुळात ‘प्रेम’  हा भावनेशी संबंधित प्रश्न .….
जेंव्हा आपले निकटवर्तीय आपल्याला टाळू पाहतात ..ह्या त्या कारणास्तव तेंव्हा हा प्रश्न उद्भवतो.
आपण जसं इतरांवर आपलेपणाने प्रेम करतो. तसंच काहीसं प्रेम आपल्याला अभिप्रेत असतं समोरच्याकडून.. हर एक परिस्थितीशी झुंजताना एक मोलाची साथ हवी असते,  त्यांची बस्स … जेंव्हा ती मिळत नाही.

तेंव्हा  नक्कीच वाटतं खर .. ..कुणीचं कुणाचं नसतं..? जो तो स्वतःसाठी जगत असतो.

पण खरचं कुणीतरी आपल्यावर प्रेम करणारं अन साथ देणारं असतंच. 
बस्सsss आपण त्याना ओळखत नाही किंव्हा तितकसं महत्व देत नाही.  जीवन हे मुळात एकटे जगण्यासाठी नाही आहे. 

आपल्याला हवे असलेले,  आपले निकटवर्तीय, आपल्या कायम सोबत असतील तर मला वाटत नाही कि असा प्रश्न कधी उद्भवेल. 
पण मुळात दोन प्रकारची माणसं असतात. स्वार्थासाठी म्हणून जवळीक करणारे अन काही निस्वर्थाने प्रेम करणारे..

हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग ….

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. 

असंच लिहिता लिहिता ..

मनातले काही ..

~ संकेत पाटेकर

कुणीचं कुणाचं नसतं रे.. - संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.