कितीदा नव्याने तुला आठवावे

” कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे….”
गाणं ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यात आसवं उतरू लागली. विरह एकांताने टाहो फोडावा
तशी एकूण त्याची अवस्था झाली. आक्रोश नि आकांताने मन ढवळलं गेलं.
भरल्या नजरेनेच त्यानं
बाजूच्या रिकाम्या ख्रुचीजवळ एकटक पाहिलं. आणि तो आठवणींच्या विरह जाळात
पुरता स्वाधीन झाला.
” किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..”
जोगेश्वरीच्या २४ कॅरट चित्रपट गृहात , लागलेला तो सिनेमा ‘ती सध्या काय
करते’
संध्याकाळची ती हुरहुरती वेळ…
चित्रपट जवळ जवळ शेवट होण्याच्या
मार्गी असताना, लागलेलं गाणं आणि त्या गाण्यानं , शब्द शब्दानं
तिच्या आठवणी संगे काहूरलेला तो…
आज मनाशी तसा तो ठरवूनच बाहेर पडला होता. तिच्यासोबत हा चित्रपट आपण पहायचा.
म्हणून दोन तिकिटं त्यानं आगाऊचं बुक करून ठेवली होती. आणि भेटीच्या त्या
घडीव आशेनं, नव्यानं स्वप्नं रंगवायला सुरवात हि….
वर्ष झालं होतं म्हणा , त्यांच्या त्या भेटीला आता…
आठवतंय ते सगळं ,
ती पहिली भेट .
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये , सांजवेळी , एकांतात…. एकमेकांच्या सहवासात
नजरेशी लपंडाव खेळत , मनाशी साधला गेलेला तो संवाद ,गढून गेलेली ती क्षणांची मैफिल , मोहरून उमळलेले ते क्षण ,ती अविस्मरणीय भेट …
आठवतंय,
कित्येक दिवस ओलांडले , महिनो सरले , पण कधी भेटणं झालंचं नाही , पुन्हा ?
प्रचंड तहानेने एखाद्याचं मन कासावीस नि भावव्याकुळ व्हावं, तडफडावं, तशी मात्र …
ह्या मनाची अवस्था
झालेय माझी..एकाकी अशी… तुझ्या त्या एका भेटीसाठी….तुला आपलंसं करण्यासाठी, तुला मिळविण्यासाठी…
किती ते कॉल्स , किती ते मेसेजेस …..कितीत्या विनविण्या , माफी ,
क्षमायाचना , ह्याची गणती नाही.
पण काहीच परिणाम नाही.
मुद्दामहून टाळायचीस ना मला ?
तुझं ते टाळणं आणि माझं मलाच सांभाळणं, हे होतंच राहिलं.
दरवेळेस सांभाळून
घेत होतो मी स्वतःला .. ,स्वतःचीचं समजूत काढत..
आज ना उद्याच्या ह्या आशेवर…
दिवस ह्यातच सरसर निघून गेले .
तू बदलली नाहीस. तुझ्या निर्णयावर ठाम राहिलीस आणि मी…
संध्याकाळच्या बोचऱ्या वाऱ्यासारखा सैरवैर होत गेलो…
माणसं प्रेमात आंधळी होतात , ह्याचा तो प्रत्यय होता . मी आंधळा झालो होतो ,
प्रेमात पुरेपूर..तुझ्या.
कशाचीचं उसंत न्हवती. तहान भूख न्हवती. झपाटलो होतो नुसता, प्रेम ह्या
अवस्थेने…
,प्रेम ह्या भावनेने,प्रेम ह्या वेदनेने,
पण ते तुला कळूनही , तू कधी, पटवूंन घेतलं नाहीस .
मी मात्र …तासंतास वेड्यावानी नजर रोखून असायचो.
दिसतेयस का कुठे ? शोध घ्यायचो. तुझ्याच , राहत्या परिसरात येऊन कित्येकदा..
कित्येकदा तसा आलो , आलो तसाच निघून गेलो मी ,
पण तो भेटीचा योग कधी जुळून आला नाही . तू भेटलीसचं नाही आणि तुझं उत्तर हि कधी आलं नाही.
आठवतंय ते सगळं…
तरीही प्रेमवेड हे मन ..ऐकतंय कुणाचं ?
काढल्या तिकिट्स , नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ”ती सध्या काय करते” ह्या निमित्ताने तरी तू भेटशील , येशील सोबत , बोलशील …, संवाद साधशील ,
ह्या वेड्या खुळ्या आणि भाबड्या आशेपायी..
वाट पहिली मी…
आलो, लोकलच्या भर गर्दीतून मार्ग काढत एकदाचा जोगेश्वरीला. सेंट्रल ते वेस्टर्न असा प्रवास करत, गाठलं ते चित्रपट गृह .. नजर फिरवली , इकडून तिकडे सर्वत्र, पण दिसलीच नाही कुठे तू ,
ओल्या नजरेनेचं मोबाईलकडे पाहत राहिलो एकटक …तसाच,
पुन्हा स्वतःची समजूत काढत, पुन्हा स्वतःला थोपवून घेत,
येईल ..येईल…येईल रे ती… वेळ गेलेली नाहीये अजून, थांब,
पंधरा एक मिनिटं आहेत नं शिल्लक ..?
थांबलो पुन्हा, मनाचं ऐकून…
पाऊलं थबकली होतीच जागी , जाणार तरी कशी ती पुढे ?
नजर पुन्हा नव्याने वेध घेऊ लागली , कान अधिक संयमाने टवकारले जाऊ लागले.
आणि वेळ मात्र नेहमीच्या आपुल्या खोडीप्रमाणे,वाकोल्या देत पुढे सरत होती. वेडा वेडा म्हणत..
मी नुसताच उभा..त्या वाटेकडे, तिची वाट पाहत..
ती …
आलीच नाही.
मनाची पूर्तता झालीच नाही.
चित्रपट मात्र पुढे सरत राहिला, आठवणींना उसवून,जागवून…वेळोवेळी,
संयमाच्या गहिऱ्या जखमा देत…गाणं मनाशी झुलवत ..
” किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..
कितीदा रडुनी जीवाने हसावे…”
” कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..”
भरल्या नजरेनं त्यानं आपल्या बाजूच्या रिकाम्या सीटकडे पुन्हा एकटक पाहिलं आणि तो पुन्हा आठवणीत गढून गेला…
प्रेमानं… एव्हाना त्याला,  वेदनेला कसं थोपवावं आणि जगावं ते शिकवलं होतं.
– संकेत पाटेकर
२४.१०.२०१७

Leave a Comment

Your email address will not be published.