काही सांगायचं आहे तुला…

काही सांगायचं आहे तुला…
ऐकशील ..?
मला माहित आहे , माझ्यावरचा राग अजूनही तुझा ओसरला नाही. तो ओसरला नसेलच. पण तरीही ..सखे …काही सांगायचं आहे मला.
ऐक ?रागावू नकोस रे ..
तसं मनातल्या मनात तू म्हणत असशीलच ? का हा असा, सारखा त्रास देतोय ?का असा छळतोय ?
मी एकदा नाही म्हटले ना , तरी हि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न …का ? हो ना ?
वेडावून त्रस्त होत असशील तू .. नाही का ? तुझ्या शब्दात म्हणायचं तर डोक्याचा भुगा होतोय ? हे ना ?
पण काय करू सखे , माझ्या बाबतीत हि असचं आहे बघ , मला हि ह्या साऱ्यांचा खूप त्रास होतोय. पण तुला रे कसं कळणार ?
आणि कळलच तरी तू , तुझं मन ….माझ्यापुढे मोकळ करणार आहेस का ?
ह्या प्रश्नाच उत्तर तसं नाहीच मिळणार , हो ना ? मला हि ह्याबद्दल काही बोलायचं नाही आहे.
पण सखे , मला त्रास होतोय म्हणून मी तुला असा त्रास देत आहे . असा विचार मात्र तू मनी धरू नकोस.
तेवढा मी असभ्य अन वाईट वर्तनाचा मुळीच नाही हा ..
खर म्हणावं तर माणसाला गैरसमजूतिचे हे धागेच खूप अधिक त्रास देतात. गुंडाळून ठेवतात. अकारण ..शंका कुशांकाच्या अंधाऱ्या झोळीत …
मला वाटतं आपल्या दुभंगलेल्या मनाचं अन तुटलेल्या ह्या नात्याचं हि हेच कारण आहे.
तो गुंता आपण काही सोडवला नाहीच. पण तो गुंता न सोडवताच , एकमेकांपासून मात्र असे दूर निघून गेलो.
म्हणावं तर अगदी जवळ आहोत आपण ..अगदी हाकेच्या अंतरावर …पण तरीही मनातून मात्र दूर असे…
कधी आठवण येते का रे , तुला माझी ?
नाही आपलं सहजच म्हटल.
तसं मनात घर केलेली माणस , सहजा सहजी विसरता कुठे येतात रे … न्हाई का ?
राहू दे ..नको सांगू ..
माझ्याकडे तुझ्या आठवणीची मात्र उजळनीच सुरु असते रोज..
किती सुखद अश्या आठवणी आहेत रे त्या , सुखद आहेत म्हणूनच निसटून गेल्याचा त्रास..
काय गम्मत आहे बघ ना,
ह्या क्षणांना पकडता येतं , बांधून ठेवता येतं , आठवणी स्वरुपात , पण व्यक्ती ….
त्यानां नाही धरून ठेवता येत रे … त्या निघून जातात..आल्या वाटे , तू हि अशीच निघालीस , न्हाई ?
मला एकाकी करून …जे घडायचंच ते घडलं . रंगवलेले सारे स्वप्न हि अपुरेच राहिले .
असो , मला माझ रडगाणं गायचं नाही आहे .
एक मात्र सांगायचं आहे सखे ,
एकेमांपासून दूर झाल्यावर , तुझं अस अबोल, एकाकी नि शांत राहण , मला स्वस्त बसू देत नाही रे,
तुला त्रास देण्याचा तसा काहीही हक्क नाही आहे मला …
हे नातंच जेंव्हा आतून तुटलं. आतून म्हणजे काळजातून ..तेंव्हाच तो हक्क मी गमावून बसलो.
म्हणायला तसं आपल्या मैत्रीच्या नात्यातला अर्क अजूनही शाबूत आहे हा..
म्हणूनच त्या हक्काने ह्या शब्दांची हि केविलवाणी धडपड …
सखे , अशी दूर नको ठेवू स्वतःला ? एकाकीपणात अशी नको रे बांधून घेऊ?
मनाचे सारे कवाड बंद करून , निशब्दाचे तुझे हे गहिरे बोल …खूप खोलवर रुजतात रे ह्या काळीजास ..त्यानेच चर्र होतंय बघ ..
त्रास होतो रे ..तुला नाही कळायचं ते.
भावनांची ओढ हि अजूनही तशीच आहे अगदी.., भलेही आपल्यात संवाद होत नसेल. भेटी गाठी होत नसतील . पण प्रेमाचं हे चीटपाखरू पंख पसरून अजूनही भिरभिरतंय रे तुझ्याच अवतीभोवती..
तुझीच खूप काळजी वाटतेय ..तुझ्या ह्या अबोलपणाची , तुझ्या तब्येतीची ..
ठीक आहेस ना ?
एकाकी अशी का रे गुंतवून ठेवतेयेस स्वतःला ?
जरा बाहेर ये ह्यातून ..
तुझ्या चेहऱ्यावरती हास्य रेषेची ती सोनेरी खळ …मला पुन्हा उजळलेली पहायची आहे .
माझ्यासाठी नाही रे , पण तुझ्या स्वतःसाठी..
हे एवढ करशील का रे ….
तुला हसताना सदैव पहायचं आहे . बाकी काही नाही .
म्हणूनच हा अट्टाहास …सखे .. 🙂 
तुझाच ..
असच लिहिता लिहिता…
– संकेत य पाटेकर
१३.०१.२०१५

Leave a Comment

Your email address will not be published.