कसं असतं ना..आपण कुणाच्या मनात किती जागा व्यापून आहोत, ह्याचा अचूक पट कधीच नाही रे मांडता येत.
हवं तर एक अंदाज तेवढा घेता येतो. तेही केवळ आपल्या समाधानासाठी,
पण तो ही कितपत खरा आणि खोटा ? ह्याचा अचूक दावा देता येत नाही.
हा..पण एक अंदाजाने घेतलेला तो विचार मात्र नात्यात फूट आणू शकतो. हे मी तुला खात्रीने इथे सांगू शकेन, हे नक्की..
कळतंय ? काय म्हणतोय ते ?
ऐक,
नको ह्या अविचारी धाग्यात स्वतःला असं गुरफटवून घेऊस.. नको हा व्यर्थ, अविचारी ताप ओढावून घेऊस..मुक्त हो..
विस्तारल्या निरभ्र आभाळागत..
त्या उनाडत्या अल्लड वाऱ्यासारखं..
संथ, वाहत्या प्रवाही गीतासारखं,
उलगडतयं का काही ?
प्रवाहित हो अरे…
आपलेपणाचा प्रेमरंग.. मना-मनाशी उधळून, मुखी अवीट गाणी घेत..
इतकंच सांगायचंय..
– संकेत पाटेकर