आई – माझी प्रेमळ आई..

आई – माझी प्रेमळ आई..

काही दिवसापूर्वीच एक स्वप्न पडलं . त्यात आईच दर्शन झालं खरं. पण त्या स्वप्नाच अर्थ काही कळला नाही. संपूर्ण दिवस मात्र भीतीने कापरत गेला.

आई – माझी प्रेमळ आई..

अजून देखील तो क्षण आठवतो अन काळजात चर्रsss होत.  सकाळचे ८ वाजून ३५ मिनिटे झाली होती. बुधवार होता. घटस्थापनाचा पहिला दिवस – देवीच आगमन झालं होतं.

नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जाण्यसाठी बाहेर पडणार होतो. तेवढ्यात आई म्हणाली.  मी सुद्धा येते तुझ्या सोबत. मी म्हणालो कशासाठी ? ती म्हणाली असच जरा फेरफटका मारण्यासाठी.

तेंव्हा माहित न्हवत . फेरफटका म्हणून बाहेर निघालेली माझी आई हि आम्हाला सोडून दूर कुठे जाणार आहे ते पुन्हा परतून न येण्यासाठीच. नशिबाची खेळी हि अजब असते. जे घडणार आहे ते घडणारच कसेही करून. आई सोबत मी बाहेर पडलो खरा.. घरापासून साधारण १५-२० मिनिटे पुढे चालत आल्यावर कुर्ल्याला जाण्याकरिता मला बस दिसली. म्हणून मी धावत पळत जावून ती पकडली. जाता जाता मात्र आईला हातानेच दूरवरून निरोप दिला आणि तोच शेवटचा क्षण ठरला तिला पाहिल्याचा..

ह्या नंन्तर मात्र आठवणीतच तिला आता पाहतो . तिच्या मायेचा स्पर्श अनुभवतो.  तिचे बोल कानी साठवतो. कळत नकळत कधी डोळ्यातून आसवे गाळतो.

त्या दिवशी नियतीला असच काहीतरी घडवायचं होत.  तिने एक खेळी केली. आई घरी परतली नाही हि बातमी सर्वांना रात्री उशिरा कळली आणि तेंव्हा फार उशीर झाला होता.  सकाळी निघालेली माझी आई कुणास ठाऊक कुठे दूरवर निघून गेली होती. ती रात्र पहाट होईपर्यंत आम्ही रस्त्यावरून नुसत भटकत होतो. तिच्या शोधार्थ. पण नाही…ती परतली नाही.

एक मात्र सांगून गेली .हा प्रसंग घडण्याच्या काही दिवस आधी.  माझी तुमच्यावर नजर असेल भले मी कुठे हि असेन आणि ती नजरच आता आमच्यवर लक्ष ठेवून आहे.

आई विना भिकारी म्हणतात ना ते खर आहे.  मायेच्या स्पर्शासाठी मी आता दुरावलो. आईच्या उबदार कुशीत डोक ठेवून शांत पडून राहणं ते हि हिरावलं. आजारपणात इतरांपेक्षा जास्त काळजी घेणारी. बाजूला बसून डोक्यावरून प्रेमाचा अलगद हात फिरवणारी ती एकमेव आई ..सार माझ्यपासून दूर गेलं. आता फक्त आठवणी आहेत.  त्या गोड मधुर तिच्या सहवासातल्या तिच्या शिकवनितल्या .

जे पुढ्यात आहे ते खायचं.  जेवणाला नाव ठेऊ नये. हे तिने शिकवल. तसं लहान पण आमच गरिबिचच होतं. घरात रॉकेलच्या दिव्यावर आम्ही रात्र काढायचो. कधी एक वेळ मसाल्या भाताशी जेवायचो. तेलात लाल तिखट मसाला मीठ मिसळत भाताशी लावून लावून खायचो. अजून ती चव जिभेवर रेंगाळते. कधी एक वेळ उपाशी तर कधी मसाल्या भाताशी. तर कधी नुसत भात आणि सोबत कोरी चहा..तेंव्हा सिलेंडर गस असा प्रकार न्हवता आमच्याकडे .त्यामुळे रॉकेल स्टोव्ह वर सर्व चालायचं . त्यसाठी हि आईची चाललेली धडपड मी पाहायचो . सकाळी सात ते आठ वाजल्यापासून ते दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत धुण्या भांड्याची कामे करत ती आम्हा सर्वाना सांभाळत होती . आणि त्यातच चांगले संस्कार करत होती.

आयुष्यात मी अजून कधी शिवीगाळ केली नाही. हि सुद्धा तिची शिकवण एकदा लहानपणी मित्राशी झालेल्या झटापटीत मी फक्त त्याला ” कुत्रा” अस रागानेच म्हटलं होत  आणि ती शिवी मानून मी मनाशी पक्का निर्धार केला होता.  एखाद्याला कुत्रा म्हणन हि देखील एक शिवीच. आणि तेंव्हा पासून अस बोलन हि मी सोडून दिल.  हि सारी तिचीच शिकवण घरी वडिलांना दारू -तंबाखूच व्यसन असतना आम्हाला वाईट व्यसने कधी लागली नाही.  हे हि तिच्यामुळेच.अशा किती तरी गोष्टी तिने शिकवल्यात. प्रेमाने समजावल्या त्या तिच्या अनुभवानेच .

त्यातलीच अजून गोष्ट म्हणजे :- माझा भाऊ आणि मी.  तिचे शब्द जसेच्या तसे कानी आहेत.  एकदा तिने सांगिलते होते. संकेत तू आणि भाऊ आप आपसापासून कधी दुरावू नका.  एकत्रित राहा . भले हि काही हि होवो .

आईचा एक दंडक असे.  मुलांनी मुलांमध्येच राहावे. मुलींनी मुलीनमधेच राहावे. मुलींच्या बाजूला बसने आईला खपत नसे . मग ती बहिण असो वा इतर कोण..अंतर ठेवूनच बसावं आणि बोलाव जे काही आहे ते. असे ती मला सांगे बहिणीच्या बाजूला हि अस अंतर ठेऊनच बसावं . ह्यावरून मात्र माझ नि आईच कधी पटल नाही.

लहानपणी मात्र आई कडे केलेला हट्ट अजून आठवतो.  मला सख्खी बहिण नाही. म्हणून तिच्याकडे सतत रडत रडत सांगायचो मला एक बहिण हवी आहे. तेंव्हा त्यापुरत ती माझी समजूत काढायची . आणू ह ! आपण एखादी छानशी बहिण तुझ्यासाठी हॉस्पिटल मधून … तेंव्हा मी कुठे शांत ह्वायचो.

आता ह्या सारया गोष्टी आठवतात अन अलगद डोळे पाणवतात.

प्रेमाने राहायला तुने शिकवलं. प्रेमाने वागायला तुने शिकवलं .

प्रेमानेच लहानच मोठ केलंस, प्रेमाशीच घट्ट नात तू जुळवून दिलंस.

माझी गोड प्रेमळ आई. कधी तरी तू येशील परत ………….हि माझ्या मनाची खात्री आहे .

संकेत पाटेकर

०५.१०.२०१३

Leave a Comment

Your email address will not be published.