आई – माझी गोड प्रेमळ आई ……

आई – माझी गोड प्रेमळ आई ……

काही दिवसापूर्वीच एक स्वप्न पडलं . त्यात आईच दर्शन झालं खरं. पण त्या स्वप्नाच अर्थ काही कळला नाही. संपूर्ण दिवस मात्र भीतीने कापरत गेला .

अजून देखील तो क्षण आठवतो अन काळजात चर्र होत . सकाळचे ८ वाजून ३५ मिनिटे झाली होती. बुधवार होता . घटस्थापनाचा पहिला दिवस – देवीच आगमन झालं होतं.

नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जाण्यसाठी बाहेर पडणार होतो. तेवढ्यात आई म्हणाली . मी सुद्धा येते तुझ्या सोबत . मी म्हणालो कशासाठी ? ती म्हणाली असच जरा फेरफटका मारण्यासाठी .

तेंव्हा माहित न्हवत . फेरफटका म्हणून बाहेर निघालेली माझी आई हि आम्हाला सोडून दूर कुठे जाणार आहे ते पुन्हा परतून न येण्यासाठीच . नशिबाची खेळी हि अजब असते . जे घडणार आहे ते घडणारच कसेही करून. आई सोबत मी बाहेर पडलो खरा . घरापासून साधारण १५-२० मिनिटे पुढे चालत आल्यावर कुर्ल्याला जाण्याकरिता मला बस दिसली . म्हणून मी धावत पळत जावून ती पकडली . जाता जाता मात्र आईला हातानेच दूरवरून निरोप दिला . आणि तोच शेवटचा क्षण ठरला तिला पाहिल्याचा .

ह्या नंन्तर मात्र आठवणीतच तिला आता पाहतो . तिच्या मायेचा स्पर्श अनुभवतो . तिचे बोल कानी साठवतो .कळत नकळत कधी डोळ्यातून आसवे गाळतो.

त्या दिवशी नियतीला असच काहीतरी घडवायचं होत . तिने एक खेळी केली . आई घरी परतली नाही हि बातमी सर्वांना रात्री उशिरा कळली . आणि तेंव्हा फार उशीर झाला होता . सकाळी निघालेली माझी आई कुणास ठाऊक कुठे दूरवर निघून गेली होती . ती रात्र , पहाट होईपर्यंत आम्ही रस्त्यावरून नुसत भटकत होतो . तिच्या शोधार्थ . पण नाही …………………ती परतली नाही .

एक मात्र सांगून गेली .हा प्रसंग घडण्याच्या काही दिवस आधी . माझी तुमच्यावर नजर असेल भले मी कुठे हि असेन . आणि ती नजरच आता आमच्यवर लक्ष ठेवून आहे

आई विना भिकारी म्हणतात ना ते खर आहे . मायेच्या स्पर्शासाठी मी आता दुरावलो . आईच्या उबदार कुशीत डोक ठेवून शांत पडून राहणं ते हि हिरावलं. आजारपणात इतरांपेक्षा जास्त काळजी घेणारी . बाजूला बसून डोक्यावरून प्रेमाचा अलगद हात फिरवणारी ती एकमेव आई ..सार माझ्यपासून दूर गेलं. आता फक्त आठवणी आहेत . त्या गोड मधुर तिच्या सहवासातल्या तिच्या शिकवनितल्या .

जे पुढ्यात आहे ते खायचं . जेवणाला नाव ठेऊ नये . हे तिने शिकवल . तसं लहान पण आमच गरिबिचच होतं . घरात रॉकेलच्या दिव्यावर आम्ही रात्र काढायचो . कधी एक वेळ मसाल्या भाताशी जेवायचो. तेलात लाल तिखट मसाला मीठ मिसळत भाताशी लावून लावून खायचो. अजून ती चव जिभेवर रेंगाळते . कधी एक वेळ उपाशी तर कधी मसाल्या भाताशी . तर कधी नुसत भात आणि सोबत कोरी चहा ,तेंव्हा सिलेंडर गस असा प्रकार न्हवता आमच्याकडे .त्यामुळे रॉकेल स्टोव्ह वर सर्व चालायचं . त्यसाठी हि आईची चाललेली धडपड मी पाहायचो . सकाळी सात ते आठ वाजल्यापासून ते दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत धुण्या भांड्याची कामे करत ती आम्हा सर्वाना सांभाळत होती . आणि त्यातच चांगले संस्कार करत होती.

आयुष्यात मी अजून कधी शिवीगाळ केली नाही .हि सुद्धा तिची शिकवण एकदा लहान पणी मित्राशी झालेल्या झटापटीत मी फक्त त्याला ” कुत्रा” अस रागानेच म्हटलं होत . आणि ती शिवी मानून मी मनाशी पक्का निर्धार केला होता . एखाद्याला कुत्रा म्हणन हि देखील एक शिवीच .आणि तेंव्हा पासून अस बोलन हि मी सोडून दिल . हि सारी तिचीच शिकवण घरी वडिलांना दारू -तंबाखूच व्यसन असतना आम्हाला वाईट व्यसने कधी लागली नाही . हे हि तिच्यामुळेच.अशा किती तरी गोष्टी तिने शिकवल्यात . प्रेमाने समजावल्या त्या तिच्या अनुभवानेच .

त्यातलीच अजून गोष्ट म्हणजे :- माझा भाऊ आणि मी , तिचे शब्द जसेच्या तसे कानी आहेत . एकदा तिने सांगिलते होते . संकेत तू आणि भाऊ आप आपसापासून कधी दुरावू नका . एकत्रित राहा . भले हि काही हि होवो .

आईचा एक दंडक असे . मुलांनी मुलांमध्येच राहावे. मुलींनी मुलीनमधेच राहावे. मुलींच्या बाजूला बसने आईला खपत नसे . मग ती बहिण असो वा इतर कोण . अंतर ठेवूनच बसावं आणि बोलाव जे काही आहे ते. असे ती मला सांगे बहिणीच्या बाजूला हि अस अंतर ठेऊनच बसावं . ह्यावरून मात्र माझ नि आईच कधी पटल नाही.

लहानपणी मात्र आई कडे केलेला हट्ट अजून आठवतो . मला सख्खी बहिण नाही. म्हणून तिच्याकडे सतत रडत रडत सांगायचो मला एक बहिण हवी आहे. तेंव्हा त्यापुरत ती माझी समजूत काढायची . आणू ह ! आपण एखादी छानशी बहिण तुझ्यासाठी हॉस्पिटल मधून … तेंव्हा मी कुठे शांत ह्वायचो .

आता ह्या सारया गोष्टी आठवतात ………..अन अलगद डोळे पाणवतात .

प्रेमाने राहायला तुने शिकवलं .

प्रेमाने वागायला तुने शिकवलं .

प्रेमानेच लहानच मोठ केलंस

प्रेमाशीच घट्ट नात तू जुळवून दिलंस.

माझी गोड प्रेमळ आई ………………….. कधी तरी तू येशील परत ………….हि माझ्या मनाची खात्री आहे .

संकेत पाटेकर

०५.१०.२०१३

Leave a Reply

Your email address will not be published.